किरण अग्रवाल
रांची : गेल्या निवडणुकीत १४पैकी तब्बल १२ जागा जिंकणाऱ्या ‘एनडीए’ने यंदा झारखंडमध्ये काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापून नवे चेहरे रिंगणात उतरविले आहेत. त्यांना चुरशीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
झारखंडमध्ये चार टप्प्यांत मतदान होणार आहे. यासाठी ‘एनडीए’ने व महाआघाडीतर्फे उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १३ मे रोजी सिंहभूम, पलामू, लोहरदगा व खुंटी या चार मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. भाजपने यंदा काही उमेदवार बदलताना पक्षात नव्यानेच प्रवेश केलेल्यांना संधी दिल्याने नाराजी उफाळून आलेली दिसत आहे. भाजपासह काँग्रेस, झामुमोतर्फे सात आमदारांनाही रिंगणात उतरविण्यात आल्यामुळे यंदा निवडणूक चुरशीची होऊ घातली आहे.
दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाच्या पुढाकारात महाविकास आघाडीची उलगुलान रॅली नुकतीच झाली असून, केंद्रातील सत्तेविरूद्ध यात रणशिंग फुंकण्यात आले. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील बनावट व्हिडीओप्रकरणी प्रदेश काँग्रेसचे एक्स सोशल मीडिया अकाउंट निलंबित करण्यात आले आहे.
हे आहेत प्रमुख उमेदवार
माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी गीता कोडा, काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले सुबोधकांत सहाय यांच्या कन्या यशस्विनी सहाय यांच्यासह झामुमो नेते शिबू सोरेन यांच्या मोठ्या सुनबाई सीता सोरेन व अन्य सहा आमदार, तीन माजी आमदारही खासदारकीसाठी नशीब आजमावत आहेत.
अब तक छप्पन्न !...
झारखंडमधून आतापर्यंत भाजप, काँग्रेस, झामुमो, राजद, भाकपा, आजसू अशा मोजक्या पक्षांच्या प्रतिनिधींनाच लोकसभेत प्रतिनिधित्त्वाची संधी मिळाली आहे.
गेल्या निवडणुकीत या राज्यात तब्बल ५६ पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुका लढविल्या.
पण, यातील पाच प्रमुख पक्ष वगळता इतर
पक्षांच्या उमेदवारांना एकूण मतांपेक्षा १० टक्के मतेदेखील मिळाली नव्हती.
पोटनिवडणुकीत उतरल्या कल्पना सोरेन
‘इडी’च्या अटकेत असलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी गांडेय विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अर्ज दाखल केला असून, झामुमो व सोरेन कुटुंबाच्या नव्या नेतृत्वकर्त्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
डबल ‘एम’ फॅक्टर निर्णायक
राज्यात १४पैकी पाच जागा आदिवासींसाठी आरक्षित आहेत. त्याखेरीज सहा जागांवर कुर्मी समाजाची मते निर्णायक ठरतात.
येथे डबल ‘एम’, म्हणजे मांझी (आदिवासी) व महतो (कुर्मी) या दोघांचीच ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते आहेत. हे समुदाय काेणाला मते देतात, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.