विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या प्रयत्नांना वेग; नितीशकुमार मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला, राहुल गांधीही उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 05:59 PM2023-05-22T17:59:51+5:302023-05-22T18:00:20+5:30
या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह आणि बिहार सरकारचे मंत्री संजय झा हेही उपस्थित होते.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विरोधी पक्षांना एकजूट करण्यासाठी प्रयत्नांना वेग दिला आहे. नितीश कुमार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. या ठिकाणी एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह आणि बिहार सरकारचे मंत्री संजय झा हेही उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे तेजस्वी यादव बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. याआधी शनिवारी कर्नाटकातील नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 18 विरोधी पक्षांचे नेते एकाच मंचावर दिसले आणि विरोधकांच्या ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जेडीयू अध्यक्ष ललन सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.
#WATCH | Bihar CM Nitish Kumar meets Congress national president Mallikarjun Kharge and party leader Rahul Gandhi at Congress chief Kharge's residence.
— ANI (@ANI) May 22, 2023
(Source: AICC) pic.twitter.com/IERTSQMItm
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नितीश कुमार गेल्या काही महिन्यांपासून विरोधी एकजुटीसाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांतर्गत मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा आणि भेट घेतली आहे. दुसरीकडे नितीश कुमार यांनीही अनेक विरोधी नेत्यांची भेट घेऊन त्यांना एकाच व्यासपीठावर येण्याचा सल्ला दिला आहे. येत्या काही दिवसांत बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
रविवारी केजरीवालांची घेतली होती भेट
नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. तेव्हा त्यांच्यासोबत तेजस्वी यादवही उपस्थित होते. याशिवाय रविवारी (21 मे) नितीश कुमार यांनी त्यांची दिल्लीतील आपचे राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. नितीश कुमार म्हणाले होते की, अरविंद केजरीवाल दिल्लीत चांगले काम करत आहेत आणि त्यांच्या सरकारला काम करण्यापासून रोखले जात आहे, हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आम्ही म्हणत आहोत.