लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला. रात्री १२ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले. राज्यातील ११ मतदारसंघांपैकी सर्वाधिक ६९.७४% बीडमध्ये, तर सर्वांत कमी ५१.२५% मतदान पुण्यात झाले.
देशातील १० राज्यांतील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के झाले. देशात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ७७.६३ टक्के, तर सर्वांत कमी जम्मू-काश्मीरमध्ये ३८.०० टक्के मतदान झाले. दुपारच्या सुमारास मतदानाचा टक्का घसरला, तरी सायंकाळी पुन्हा गर्दी झाली होती.
महाराष्ट्र - ६३.७१% पहिला टप्पा, ६२.७१% दुसरा टप्पा, ६३.५५% तिसरा टप्पा, ५९.६४% चाैथा टप्पा
आंध्र, ओडिशात विधानसभेचे मतदान
आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ जागांसाठी आणि ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी २८ जागांसाठी लोकसभेसोबतच मतदान झाले. आंध्र प्रदेशमधील हिंसाचाराच्या अनेक घटनांशिवाय ओडिशात काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटनांची नोंद झाली, मात्र अर्ध्या तासात त्या बदलून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.
आंध्रात आमदार, मतदाराने एकमेकांच्या कानशिलात लगावली...
आंध्र प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचारप्रकरणी वायएसआर व टीडीपीने परस्परांविरोधात तक्रार दाखल केली. निवडणूक नियमांचे उल्लघंन केल्याने टीडीपीविरोधात वायएसआरने तक्रार दाखल केली. मतदानासाठी रांगेत न आल्याचा जाब विचारला म्हणून आंध्रमध्ये वायएसआरचे आमदार अण्णाबथुनी शिवकुमार यांनी एका मतदाराला चपराक लगावली. प्रत्युत्तरादाखल त्यानेही आमदाराच्या कानशिलात लगावली. पश्चिम बंगालच्या बोलपूरमध्ये मतदानापूर्वी रविवारी रात्री तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. बंगालच्या दुर्गापूरमध्ये भाजप व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.