यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणांमधून काँग्रेसने जाहीरनाम्यामधून दिलेल्या आश्वासनांचे वाभाडे काढत आहेत. सोबतच आपल्या सरकारच्या काळात झालेली देशाची प्रगती आणि अर्थव्यवस्थेने घेतलेली मोठी झेप यांचाही उल्लेख करत आहेत. पुढच्या काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा दावा मोदींकडून केला जात आहे. या दाव्यावरून माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदींना टोला लगावला आहे. मोदींनी फुकटच्या बढाया मारू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
पी. चिदंबरम म्हणाले की, पंतप्रधान कुणीही असला तरी भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणारच आहे. मोदींनी भारतीय बाजाराचा आकार पाहता भविष्यात खऱ्या ठरणाऱ्या एका शक्यतेला आपली गॅरंटी म्हणून सांगत आहेत. भारत आपल्या लोकसंख्येच्या आकाराचा विचार करता हे स्थान मिळवणारच आहे. त्यामध्ये जादुई असं काहीच नाही आहे, असा टोला चिदंबरम यांनी लगावला.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या २०२४ च्या रँकिंगनुसार ४.८ लाख कोटी डॉलर जीडीपीसह भारत आता जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. केवळ अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे देश भारताच्या पुढे आहेत. तर जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या यादीत फ्रान्स, इटली, ब्राझील, कॅनडा आणि ब्रिटन हे देश भारताच्या मागे आहेत.
चिदंबरम यांनी एका मुलाखतीत सांगितले की, नरेंद्र मोदी हे एखादी गोष्ट अतिशयोक्ती करून सांगण्यात पटाईत आहेत. ते पुढच्या काळात निश्चितपणे घडणाऱ्या गोष्टीला गॅरंटीचं रूप दिले आहे. भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणार आहे. हे होणारच आहे. २००४ मध्ये भारताचा जीडीपी १२ व्या क्रमांकावर होता. २०१४ मध्ये तो सातव्या क्रमांकावर आला. २०२४ मध्ये भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. पंतप्रधान कुणीही असला तरी भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. त्यात कुठलीही जादू नाही. आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार पाहता अंकगणितीय दृष्ट्या हे आपण समजून घेतले पाहिजे.