PM मोदींच्या फोनमुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबले; माजी नौसैनिक सुखरुप परतले- राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 04:01 PM2024-04-07T16:01:40+5:302024-04-07T16:02:12+5:30
'जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे मत गांभीर्याने घेतले जाते. जग भारताकडे विश्वासाने पाहत आहे.'
Rajnath Singh Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते विविध भागात प्रचार सभा घेत आहेत. तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच बडे नेते पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. अशातच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करण्यासोबतच मोदी सरकारच्या कामाचाही पाढा वाचला.
'रामनवमी येत आहे, या पापी लोकांना विसरू नका', PM मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
राज्यातील मागील सरकारवर टीका करताना राजनाथ सिंह म्हणाले की, काँग्रेस सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नव्हती. घरात घुसून लोकांचे गळे कापण्यात आले, लोकांना मारण्यात आले. परंतु आता भजनलाल सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ज्या प्रकारे कृतीशील पावले उचलली, ते कौतुकास्पद आहे. कोणत्याही क्षेत्राच्या विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था अतिशय महत्वाचे असते.
मोदींच्या आवाहनामुळे रशियाने युक्रेन युद्ध थांबवले
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले की, जेव्हा हे युद्ध सुरू झाले, त्यावेळी भारतातील अनेक मुले युक्रेनमध्ये शिकत होती. मुलांच्या पालकांनी त्यांना युक्रेनमधून परत आणण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींना केले. यानंतर पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना फोन केला. त्यानंतर साडेचार तासांसाठी युद्ध थांबले आणि भारतीय नागरिक सुखरुप परत आले.
बीकानेर (राजस्थान) में चुनावी जनसभा
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) April 7, 2024
https://t.co/BJ7zNl48jF
मोदींमुळे माजी नौसैनिकांची शिक्षा माफ झाली
राजनाथ सिंह यांनी यावेळी कतरमध्ये माजी सैनिकांना दिलेल्या शिक्षेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, पाच अरब देशांनी पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च सन्मान केलाय. एवढचं काय तर, कतरला गेलेल्या भारतीय नौदलाच्या माजी कर्मचाऱ्यांना तेथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पण, पीएम मोदींनी कतरच्या प्रमुखांना फोन केला आणि त्यानंतर नऊ माजी सैनिकांची सुटका करण्यात आली.
जगात भारताची प्रतिष्ठा वाढली
याशिवाय संरक्षणमंत्र्यांनी केंद्रातील मोदी सरकारचेही कौतुक केले. ते म्हणाले की, जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली, हे कोणीही नाकारू शकत नाही. यापूर्वी कोणीही भारताचे म्हणणे गांभीर्याने घेत नसायचे, पण आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या मताला गांभीर्याने घेतात. जग भारताकडे आशा आणि विश्वासाने पाहत आहे. या सर्व गोष्टींचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जाते.
एक देश एक निवडणूक...
एक देश एक निवडणुकीवर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाटी पुढाकार घेतला आहे. देशात पुन्हा पुन्हा निवडणुका होऊ नयेत, यासाठी पंतप्रधानांनी एक समिती स्थापन केली होती, ज्याचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करण्यात आला आहे. देशातील जनताही याला साथ देईल, त्यामुळे पैशाबरोबरच वेळेचीही बचत होईल. मात्र काँग्रेसचा त्याला विरोध आहे, प्रत्येक गोष्टीला विरोध करणे, हा काँग्रेसचा स्वभाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.