लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये स्वबळावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला यावेळी बहुमतानं हुलकावणी दिली आहे. त्याबरोबरच २४० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाच्या जनाधारामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून येत आहे. जवळपास १६ राज्यांमध्ये भाजपाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत घट झाली आहे.
२०१९ च्या तुलनेत यावेळी भाजपाला ६८.९७ लाख अधिक मतं मिळाली आहेत. मात्र भाजपाच्या मतांचा टक्का मात्र किंचीत घटला आहे. २०१९ मध्ये भाजपाला ३७.७ टक्के मतं मिळाली होती. मात्र आता हा आकडा ०.७ टक्क्यांनी घटून ३६.६ टक्क्यांवर आला आहे. मात्र केवळ ०.७ टक्क्यांनी घटलेल्या मतदानामुळे भाजपाच्या २०१९ च्या तुलनेत तब्बल २० टक्के जागा कमी झाल्या आहेत. २०१९ मध्ये भाजपाने ३०३ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता हा आकडा घटून २४० वर आला आहे.
काही ठिकाणी भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. मात्र अनेक मतदारसंघात भाजपाला अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला ३६.६ टक्के मतं आणि लोकसभेतील ४४.१ टक्के जागा मिळाल्या. मात्र समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ६२ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी केवळ ३३ जागांवरच विजय मिळाला आहे. अशा प्रकारे भाजपाचं २९ जागांचं नुकसान झालं आहे. एवढंच नाही तर २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात तब्बल ५० टक्क्यांच्या आसपास मतं मिळवणाऱ्या भाजपाच्या मतांच्या टक्केवारीमध्येही तब्बल ८.६ टक्क्यांनी घट झाली आहे. केवळ उत्तर प्रदेशच नाही तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, झारखंड, कर्नाटक, बिहार, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, अरुणाचल प्रदेश, चंडीगड,उत्तरराखंड आदी राज्यांमध्येही भाजपाचा जनाधार घटला आहे.
त्यातही उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा आणि बिहारमध्ये झालेलं नुकसान हे भाजपासाठी चिंता वाढवणारं आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये पुढच्या काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. तसेच दोन्ही राज्यांमधील परिस्थिती ही भाजपाला प्रतिकूल दिसत आहे.