'मोदींवर वैयक्तिक टीका करुन विरोधक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत'-ओमर अब्दुल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 07:58 PM2024-03-08T19:58:54+5:302024-03-08T19:59:50+5:30
'चौकीदार चोर है, अदानी-अंबानी, राफेल, कुटुंब, हे सगळे मुद्दे पंतप्रधान मोदींच्या विरोधात चालत नाहीत.'
Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. आता यावरुन नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. शुक्रवारी माध्यमाशी संवाद साधताना अब्दुल्ला म्हणतात, 'पीएम मोदींच्या कुटुंबावर भाष्य करुन विरोधक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. मोदींवरील वैयक्तिक टीका विरोधकांनाच अडचणीत आणतात.' दरम्यान, अब्दुल्ला यांचा पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहे.
अलीकडेच राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधानांच्या कुटुंबाबाबत टीका केली होती. याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, 'गेल्या निवडणुकीत 'चौकीदार चोर है'चा नारा देण्यात आला, तो विरोधकांवर उलटला. मी अशा घोषणांच्या बाजूने कधीच नव्हतो आणि या घोषणांमुळे आम्हाला कधीही फायदा झालेला नाही. अशा घोषणांमुळे विरोधकांचेच नुकसान होते. मतदारांना अशा घोषणांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना आज त्यांच्यासमोरील समस्या कशा सुटतील, हे जाणून घ्यायचे आहे.'
लालू यादव यांनी पंतप्रधानांच्या कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत ओमर अब्दुल्ला म्हणाले, 'त्या वक्तव्यावरुन आम्हीच त्यांना ओपन गोल पोस्ट दिला आहे. आता ते या संधीचा फायदा घेत आहेत. याचे उत्तर आता आमच्याकडे नाही. मी एवढेच म्हणेन की, आपण असे वैयक्तिक राजकारण करू नये, तर जनतेचे प्रश्न मांडले पाहिजेत. चौकीदार, अदानी-अंबानी, राफेल, कुटुंब- हे सगळे मुद्दे पंतप्रधान मोदींच्या विरोधात चालत नाहीत.'
'मोदींच्या भाषणात काहीच नवीन नव्हते'
यावेळी अब्दुल्ला यांनी नरेंद्र मोदींच्या श्रीनगरमधील भाषणावरही टीका केली. 'पंतप्रधानांच्या भाषणात नवीन काहीच नव्हते. ज्या गोष्टींबद्दल ते नेहमी बोलतात, त्याच गोष्टी पंतप्रधानांनी बोलल्या. लोकसभा निवडणुकीबाबत पंतप्रधानांनीही काहीही स्पष्ट केलेले नाही. पंतप्रधान मोदी स्वत: निवडणुकीची घोषणा करू शकत नसले तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या 31 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी विधानसभा निवडणुका घेण्याबाबत त्यांनी निश्चितपणे माहिती द्यायला हवी होती. मुदतीपूर्वी निवडणुका होणार असल्याचे त्यांनी जनतेला सांगायला हवे होते. पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याबद्दल सांगायला हवे होते. बेरोजगार तरुणांसाठी रोजगार पॅकेज जाहीर करायला हवे होते. पण पंतप्रधान यापैकी एकाही मुद्द्यावर बोलले नाहीत,' अशी टीका त्यांनी केली.