Arvind Kejriwal On Opposition Meeting: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी बिहारच्या पाटण्यात 23 जून रोजी एक मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपविरोधात रणनीती आखण्याबाबत विरोधी पक्ष चर्चा करतील. या बैठकीपूर्वी 'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी (20 जून) काँग्रेसवर शेलक्या शब्दात टीका केली.
दिल्लीत लागू झालेल्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा संदर्भ देत मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, "23 जून रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्व पक्ष काँग्रेसला केंद्रीय अध्यादेशावर आपली भूमिका मांडण्यास सांगतील. बैठकीचा सर्वात पहिला मुद्दा अध्यादेश असेल.'' ते पुढे म्हणाले, "मी माझ्यासोबत संविधानाची प्रत घेऊन येईन. मी तिथल्या सर्व पक्षांना समजावून सांगेन की, हा अध्यादेश फक्त दिल्लीत आणला नाहीये. हा अध्यादेश तामिळला, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगालसह कोणत्याही राज्यात लागू होऊ शकतो.''
केजरीवालांनी काँग्रेसकडे मागितला होता पाठिंबा
केंद्राच्या अध्यादेशाविरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी, शरद पवार, एमके स्टॅलिन, नितीश कुमार यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांनी केजरीवालांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता. पण, अद्याप वेळ देण्यात आलेला नाही.
अध्यादेशावरुन भाजपवर निशाणाभाजपवर निशाणा साधत केजरीवाल म्हणाले, "केंद्रातील भाजप सरकारने त्यांच्या काळ्या अध्यादेशाद्वारे दिल्ली सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. आज राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरणाची बैठक पार पडली. केंद्र सरकारने मुख्यमंत्र्याच्या वर चीफ सेक्रेटरी आणि प्रत्येक मंत्र्यांच्या वर अधिकारी बसवला आहे. केंद्र सरकारचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण असेल. हे संविधानाच्या विरोधात आहे.''