लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यादरम्यान, काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांन केलेल्या दोन विधानांमुळे काँग्रेसची कोंडी झाली होती. त्यातच आता वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामुळे प्रचार ऐन रंगात आला असताना पुन्हा एकदा वाद ओढवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तानभारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.
एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानबाबत भाष्य करताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, हे आपण विसरून चालणार नाही. सध्या देशात सत्तेवर असलेलं सरकार आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही असं का सांगत आहे हे मला कळत नाही आहे. तिथे दहशतवाद असल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही, असं सरकार का सांगतंय. दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी चर्चा खूप आवश्यक आहे. अन्यथा भारत आपल्या अहंकारापायी जगभरात पाकिस्तानलला कमीपणा देतोय, असं पाकिस्तानला वाटू शकतं. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील कुठलाही माथेफिरू त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करू शकतो.
अय्यर पुढे म्हणाले की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत तसे ते आमच्याकडेही आहेत. मात्र जर कुणी माथेफिरूने लाहोरमध्ये अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला तर त्याचा किरणोत्सार अमृतसरपर्यंत पोहोचण्यास ८ सेकंदही लागणार नाहीत. जर आम्ही त्यांचा सन्मान केला तर ते शांत राहतील. मात्र आपण त्यांना कमीपणा देत राहिलो तर त्यांच्यापैकी कुणीतरी माथेफिरू येईल आणि बॉम्ब टाकेल, असा इशारा मणिशंकर अय्यर यांनी दिला.
आम्ही सत्तेत असताना भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दृढ करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मागच्या १० वर्षांमध्ये सगळ्या चर्चा बंद पडल्या आहेत. समोरच्याकडे फारसं बळ नसेल तेव्हाच आपण बळ दाखवलं पाहिजे. त्यांचं बळ रावळपिंडीमधील कहुटा येथे आहे. जर काही गैरसमज निर्माण झाला तर खूप अडचणी निर्माण होऊ शकतात. मणिशंकर अय्यर पुढे म्हणाले की, राजीव गांधी यांनी पाकिस्तानसोबत युद्ध होण्याची शक्यता असताना शांततेचा मार्ग निवडला होता. आजच्या काळातही पाकिस्तानसोबत शांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र नरेंद्र मोदी हे युद्धाचा मार्ग शोधत आहेत,अशी टीका मणिशंकर अय्यर यांनी केली.