Petition In Delhi High Court Against PM Narendra Modi: एकीकडे देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. वातावरणातील पारा आणि राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. ४०० पारचे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशभरात प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून, नरेंद्र मोदी यांच्यावर ६ वर्षे निवडणुका लढवण्याची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. पंतप्रधान मोदींना ६ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी कथितपणे देव आणि पूजास्थळाच्या नावावर मते मागून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात यावे, असे या याचिकेत म्हटले आहे.
कुणी केली याचिका अन् नेमके प्रकरण काय?
दिल्ली उच्च न्यायालयात वकील आनंद एस. जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. ०९ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या पीलीभीतमधील भाषणाचा उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी संबोधित करताना, मतदारांना हिंदू देवता आणि हिंदू पूजास्थळे तसेच शीख देवता आणि शीख प्रार्थनास्थळांच्या नावाने भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात राम मंदिराचे लोकार्पण आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉरही विकसित केल्याचे सांगितले. गुरुद्वारांमध्ये दिल्या जाणाऱ्या लंगरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवरही जीएसटी हटवण्यात आल्याचे सांगितले. अफगाणिस्तानातून गुरू ग्रंथसाहिबच्या प्रती मागवण्यात आल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी केवळ हिंदूच नव्हे तर शीख देवतांच्या आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या नावावर मते मागितली, असे याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, सदर धार्मिक मुद्दे उपस्थित करून पंतप्रधान मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई व्हावी आणि ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.