लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा आज पार पडत आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणौत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत कौर बादल आदी विराेधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत. अशातच पश्चिम बंगालमधून मतदानावेळी हिंसाचाराचे वृत्त येत आहे.
तृणमूल काँग्रेसचा गड असलेल्या दक्षिण बंगालमध्ये ‘जुने विरुद्ध नवीन’ सत्तासंघर्ष दिसून येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भांगरमध्ये बॉम्बफेक करण्यात आली आहे. यामध्ये सीपीएम आणि आयएसएफचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. हिंसा थांबविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
जाधवपूर लोकसभा मतदारसंघातील ही घटना आहे. भांगरच्या सतुलिया भागात टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी आयएसएफ आणि सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगना च्या कुसताईमध्ये जमावाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन नाल्यात फेकल्या आहेत. टीएमसी कार्यकर्त्यांनी मतदान करताना धमक्या दिल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी ईव्हीएम पाण्यात फेकल्याचे समोर येत आहे.
निवडणूक आयोगाने सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार रात्री 9 वाजेपर्यंत 11.31 टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत हिमाचल प्रदेश पुढे आहे तर ओडिशा मागे आहे.