Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी(दि.7) 93 जागांवर मतदान झाले, म्हणजेच जवळपास निम्म्या निवडणुका पार पडल्या आहेत. अशातच पंतप्रधान मोदींकडून मुस्लिमांबाबत एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. एकीकडे पीएम मोदींनी मुस्लिम समाजाला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. तर, दुसरीकडे भाजप नेत्यांनी मुस्लिमांमधील दाऊदी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि इतर नेत्यांनी दाऊदी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. निवडणुकीसाठी पक्षाच्या विशेष कार्यक्रमाचा भाग म्हणून ही भेट झाली. या बैठकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम, मुंबई दक्षिण येथील शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव आणि यूपीचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्माही उपस्थित होते. विशेष म्हणजे, यापूर्वीच भाजप आपल्या नेत्यांना पसमंदा मुस्लिमांमध्ये जाऊन केंद्राच्या योजनांबद्दल माहिती देण्याचा सल्ला देण्यात आला होता. भाजपचे अनेक नेते पसमांदा परिषदांनाही गेले.
निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांनीही पहिल्यांदाच थेट मुस्लिम समाजाला राजकारणाबाबत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्याची काळजी घेण्यास सांगितले. हिंदी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम व्होट बँकेबाबत भाष्य केले. मी या विषयांवर यापूर्वी कधीही चर्चा केलेली नाही. पण, आता पहिल्यांदाच मुस्लिम समाजाला आणि त्यांच्यातील सुशिक्षित लोकांना आत्मपरीक्षण करण्यास सांगत आहे. कुणाला सत्तेवर बसवायचे आणि कुणाला हटवायचे, याचा विचार करा, अन्यथा तुमच्या मुलांचे भवितव्यच उद्ध्वस्त होईल, असे मोदी म्हणाले.
मुस्लिमविरोधी आरोपांवरही पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, आम्ही ना इस्लामच्या विरोधात आहोत ना मुस्लिमांच्या विरोधात आहोत. काँग्रेसच्या काळात सरकारी व्यवस्थेचे फायदे त्यांना का मिळाले नाहीत? याचा विचार करावा. मुस्लिम समाजालाही समजते की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीने त्यांना प्यादे बनवले आहे. कोणताही गाजावाजा न करता झालेला विकास पाहून मुस्लिम समाजही भाजपसोबत एकत्र येतोय, असेही मोदी म्हणाले.