PM Modi vs Congress ZMM, Lok Sabha Election 2024: झारखंडमधील जमशेदपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर जोरदार हल्लाबोल केला. "काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोच्या लोकांना विकासाची पर्वा नाही. त्यांचा संबंध फक्त भ्रष्टाचार आणि खोटे बोलण्याशी आहे. काँग्रेस आणि झामुमोने आपल्या घरात काळ्या पैशाचा ढीग ठेवला आहे," अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीका केली.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोच्या लोकांना विकासाचा ABCD सुद्धा माहित नाही. गरिबांच्या मालमत्तेचा एक्स-रे काढणे, एससी-एसटी-ओबीसीचे आरक्षण हिसकावणे, मोदीजींना रोज शिव्या देणे हे त्यांचे काम आहेत. या पलीकडे ते विचार करू शकत नाहीत."
"झारखंडमध्ये झामुमोने जमीन घोटाळा केला. त्यांनी गरीब आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, लष्कराच्या जमिनी बळकावल्या. त्यांच्या घरातून जप्त झालेल्या चलनी नोटांचे डोंगर तुमच्याकडून लुबाडलेले आहेत. या अप्रामाणिक लोकांच्या घरात लपून बसलेला पैसा आता मोदी शोधून काढतोय. मी हे पैसे सरकारी तिजोरीत नेण्यासाठी वसूल करत नाही तर मी हे सर्व पैसे ज्यांच्या मालकीचे आहेत, त्या गरीब लोकांना परत करण्याचा मार्ग शोधत आहे. ही मोदींची गॅरंटी आहे," असा विश्वास त्यांनी लोकांना दिला.
"काँग्रेस पक्ष उद्योजकांना देशाचे शत्रू मानतो. जे उद्योगपती त्यांना पैसे देत नाहीत, त्यांच्यावर ते हल्ला करतात, म्हणजेच काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांना देशातील उद्योगांची चिंता नाही. त्यांचे नेते असे उघडपणे सांगतात. ते त्यांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीशी संबंधित आहेत. काँग्रेसचे राजपुत्र उद्योग, उद्योगपती आणि गुंतवणुकीला रोज विरोध करतात. येत्या काळात कोणता उद्योगपती त्यांच्या राज्यात जाऊन भांडवल गुंतवणार आहे? त्या राज्यातील तरुणांचे काय होणार?" असा सवालही मोदींनी केला.