लोकसभा निवडणूक 2024 साठीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात लोकसभेच्या ८८ जागांसाठी तब्बल 1206 उमेदवार रिंगणात आहेत. 19 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात 102 जागांवर सुमारे 65.5 टक्के मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 एप्रिलला मतदानादरम्यान घडलेला एक खास किस्सा शेअर केला आहे. किस्सा असा आहे की, एक ग्रामीण भागातील महिला मतदानासाठी बूथवर पोहोचली. तेव्हा ईव्हीएम मशीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो न दिसल्याने ती महिला गडबडली आणि आपण केवळ मोदींनाच मतदान देणार असल्याचे तिने बूथ अधिकाऱ्यांना सांगितले. पंतप्रधान मोदींनी केवळ हा किस्साच सांगितला नाही, तर आपल्या कार्यकर्त्यांनाही सल्ला दिला आहे.
ही घटना राजस्थानातील सीकरमधील पिपराणी गावातील एका मतदान केंद्रावरील असल्याचे बोलले जाते. येथे १९ एप्रिलला मतदान झाले. मतदान सुरू झाल्यानंतर, सकाळी 11 वाजता एका शाळेतील बूथवर गावातील काही महिला गाणी म्हणत पोहोचल्या होत्या. यावेळी मतदान केंद्रात एका महिलेने ईव्हीएम मशिनवर मोदींचा फोटो न दिसल्याने मतदान करण्यास नकार दिल्याचे आढळून आले. महत्वाचे म्हणजे या महिलेचा आवाज केंद्रा बाहेर येत होता.
बूथ अधिकाऱ्यांनी समजावलं तेव्हा कुठे... -भाजप कार्यकर्ता लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेले वृत्तपत्रातील एक कटिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केले आहे. संबंधित बातमीनुसार, आपल्याला जोपर्यंत मशीनवर मोदींचा फोटो दिसत नाही तोपर्यंत आपण मतदान करणार नाही, असे ही महिला म्हणत होती. यावेळी, येथे मोदी नव्हे तर मोदींच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असते. तसेच त्यांच्या मतदारसंघात मोदी नव्हे तर दुसरा कुणी उमेदवार उभा आहे, असे समजावल्यानंतर, संबंधित महिलेने मतदान केले.
पक्ष कार्यकर्त्यांना मोदींचा सल्ला - पक्षाच्या कार्यकर्त्याने शेअर केलेल्या संबंधित पोस्टवर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रियाही दिली आहे. त्यांनी X वर म्हटले आहे. "माता-भगिनींचे प्रेम पाहून माझ्या डोळ्यात पाणी आहे. हे ऋण फेडण्याचा संकल्पही आहे. मात्र लक्ष्मीकांतजी, आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने लक्ष देऊन, घरो घरी जाऊन लोकांना जागरुत करणे, ही आपली कार्यकर्ता म्हणून जबाबदारी आहे," ससेही मोदींनी म्हटले आहे.