बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात शुक्रवारी चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. याच दरम्यान, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आरजेडी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तेजस्वी यादव यांच्यासारखे नेते देशाला नवी दिशा देऊ लागले तर लालू-राबडी देवी यांनी बिहारची जी अवस्था केली होती, तशीच देशाचीही होईल, असं ते स्पष्टपणे म्हणाले.
यामुळे देशाचे काहीही भले होणार नाही, असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले. असं असूनही त्यांनी तेजस्वी यादव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते स्पष्टपणे म्हणाले की, "तेजस्वी यांचे वडील लालू प्रसाद यादव आणि आई राबडी देवी हे बिहारचे मुख्यमंत्री होते आणि तेजस्वी स्वतः उपमुख्यमंत्री होते, त्यांनी बिहारला दिशाहीन केलं आहे."
प्रशांत किशोर यांनी पुढे म्हटलं आहे की, "जर बिहारच्या जनतेने तेजस्वी यादव यांना जबाबदारी दिली असेल तर त्यांनी बिहारमधील काही विभागांची स्थिती सुधारावी. बिहारमधील रूग्णालयांची स्थिती सुधारावी, बिहारमधील रस्त्यांची स्थिती सुधारावी, नाल्यांची स्थिती सुधारावी."
प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांना ना भाषेचं ज्ञान आहे, ना विषयाचं ज्ञान आहे. पण जर त्यांना धारदार भाष्य करायचं असेल तर ते बसून इस्रायल आणि पॅलेस्टाईनवर करतील असंही म्हटलं आहे. बिहारमधील गरीब मुलांच्या शरीरावर कपडे नाहीत, खायला अन्न नाही, रोजगार नाही पण ते गाझामध्ये काय चालले आहे, यावर टिप्पणी करत आहेत. समाजातील लोक निरर्थक बोलणाऱ्यांना तळागाळातील नेते मानतात, ज्यांना ना भाषेचे ज्ञान आहे ना विषयाचे असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.