लोकसभा निवडणुकांसाठी देशात प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. दरम्यान, आज सकाळी झारखंडमध्ये मंत्री आलमगीर आलम यांच्या पीएसच्या नोकराच्या घरात मोठं घबाड सापडले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील नबरंगपूर येथील सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी या नोटांच्या ढिगाऱ्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांना घेरले.
पीएम नरेंद्र मोदी म्हणाले,'मी एक रुपया पाठवला तरी तो खायला देणार नाही. जो खाईल तो तुरुंगात जाईल आणि तुरुंगाची भाकरी खाईळ. आज तुम्ही घरी गेलात तर टीव्हीवर पहा आज शेजारच्या तुम्हाला नोटांचे डोंगर दिसत आहेत. मोदींनी माल पकडला आहे. चोरी तिथेच थांबली आहे. त्यांची लूटमार थांबवली. आता मोदींना शिव्या देणार की नाही? शिवीगाळ झाल्यानंतर मी काम करावे की नाही? तुमचा हक्काचा पैसा वाचला पाहिजे की नाही?, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
ईडीने रांची, झारखंडमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या सेवकाच्या घरातून ईडीने मोठी रोकड जप्त केली आहे. ही रोकड 20 ते 30 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. नोटा मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले आहेत.
पीएम मोदी म्हणाले, 'नबरंगपूर ते छत्तीसगड हे अंतर 50-60 किलोमीटर आहे. तिथे भाजप सरकार 3,100 रुपये प्रतिक्विंटल दराने धान खरेदी करते. तर इथे ओडिशात ते फक्त 2,100 रुपयांना विकत घेतले जाते. ओडिशा भाजपने भाजप सरकार स्थापनेच्या दुस-याच दिवशी 3100 रुपये प्रति क्विंटल दराने धानाची खरेदी केली जाईल, असे जाहीर केले आहे.