Pm Narendra Modi ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय वारसदार कोण असेल यावर चर्चा सुरू आहेत. काही दिवसापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला होता,"भाजपा सरकार पुन्हा सत्तेत आले तर मोदी पंतप्रधानपद अमित शाह यांच्याकडे देऊ शकतात',असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला आज स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील महाराजगंज येथे एका सभेला संबोधित केले.
उत्तराधिकारीबाबतच्या चर्चेवर बोलताना पीएम मोदी म्हणाले, माझा कोणीही उत्तराधिकारी नाही. देशातील जनता माझे उत्तराधिकारी आहेत. बिहार ही राजेंद्र प्रसादांची भूमी आहे, पण आरजेडी आणि काँग्रेसने ती वसुलीसाठी बनवली आहे. या रॅलीत आलेल्या लोकांनी प्रत्येक गावात जाऊन लोकांना सांगा की आम्ही मोदीजींच्या वतीने आलो आहोत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. पुन्हा एनडीएचे सरकार आल्यास त्यांना घरे कशी मिळणार ते सांगा. ही घरे घरातील महिला प्रमुखाच्या नावावर असतील. येणारी पाच वर्षे बिहारमध्ये समृद्धी घेऊन येणार आहेत. आमच्या बहिणी आता ड्रोन पायलट होतील. तीन कोटी बहिणींना लखपती दीदी बनवण्याची आमची हमी आहे, असंही पीएम मोदी म्हणाले.
"उमेदवारांकडे पाहू नका, तर पंतप्रधानांना निवडून द्या. तुमचे मत केवळ खासदार निवडण्यासाठी नाही तर पंतप्रधान निवडण्यासाठीही आहे, तुम्हा सर्वांना सांगावे लागेल की आमचे मोदीजी आले होते आणि त्यांनी तुम्हाला जय श्रीराम म्हटले आहे. तुम्ही लोक माझा जयश्री राम घराघरात पोहोचवाल का?, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील जनता पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा निवडून देणार हे हे लोक सहन करू शकत नाहीत. ४ जूनची तारीख जसजशी जवळ येत आहे. या लोकांकडून मला मिळणाऱ्या शिव्याही वाढत आहेत, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीला लगावला.