काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी महाराजगंजमध्ये सभा घेतली. याच दरम्यान जनतेला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधानांच्या भाषणावर म्हणाल्या की, "मोदींनी राहुल गांधी आपल्या भाषणात अदानी अंबानींचं नाव घेत नाहीत असं म्हटलं. पण सत्य हे आहे की, राहुल गांधी दररोज नावं घेतात, दररोज यांचं सत्य तुमच्यासमोर आणतात, खुलासा करतात" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "राहुल गांधीजी तुम्हाला दररोज सांगतात की, नरेंद्र मोदींचे मोठमोठ्या उद्योगपतींसोबत संबंध आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या मित्रांचं 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. इकडे उत्तर प्रदेशात त्यांचेच सरकार आहे राज्यात आणि केंद्रातही. येथील शेतकरी एक लाख रुपयांसाठी आत्महत्या करत आहेत. त्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ झालेले नाही. याचं उत्तर मोदींनी द्यावं."
"गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींनी फक्त तुम्हाला फसवलं आहे. या देशातील सर्व संपत्ती त्यांनी आपल्या करोडपती मित्रांना दिली आहे. यामध्ये देशाची बंदरे, देशाचे विमानतळ, देशातील कोळसा, वीजनिर्मिती प्रकल्प, मोठमोठ्या संस्था होत्या" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
राहुल गांधी काँग्रेसकडून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रियंका गांधी त्यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. यासाठी प्रियंका गांधी सोमवारपासून येथे राहिल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. तसेच त्या सभा देखील घेणार आहेत.