गुजरातमध्ये जनतेला संबोधित करताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपाच्या 'अबकी बार 400 पार' या घोषणेला घोटाळा म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये पाठवणं हा सत्ताधारी पक्षाचा कट आहे असंही म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाजपाची ही रणनीती असल्याचा दावा भगवंत मान यांनी केला आहे
भाजपाच्या 400 पार करण्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री मान म्हणाले की, भारतातील 140 कोटी जनता ठरवेल की कोणाला किती जागा मिळतील. हा देश कोणाची खासगी मालमत्ता नाही. भरूच शहरात आम आदमी पार्टीचे उमेदवार चैत्रा वसावा यांच्या समर्थनार्थ रोड शो आयोजित केल्यानंतर सीएम मान यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्याबाबत ते म्हणाले की, "निवडणुकीपूर्वी मतदारांना गॅरंटी देण्याचा ट्रेंड केजरीवाल यांनीच सुरू केला. फक्त केजरीवाल गॅरंटी द्यायचे. आता भीतीपोटी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात गॅरंटीची चर्चा सुरू केली आहे."
"'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीच शाळा, रुग्णालये आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. अरविंद केजरीवाल यांनीच शाळा, रुग्णालये, पायाभूत सुविधा आणि वीज यावर बोलायला शिकवलं आहे." भाजपावर हल्लाबोल करताना पंजाबचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ते फक्त द्वेष पसरवतात. जातीपातीच्या राजकारणाच्या चिखलात ते अडकलेले असताना आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत.
आदिवासीबहुल भरुच लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे आमदार आणि युवा आदिवासी नेते चैत्रा वसावा हे भाजपाचे सहा वेळा खासदार मनसुख वसावा यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. गुजरातमधील लोकसभेच्या सर्व 26 जागांसाठी सात मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. रोड शो दरम्यान विजयाची नोंद करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की जनता मला निवडून देईल असा मला विश्वास आहे. लोकांनी मनसुख वसावा यांना 25 वर्षे दिली पण बेरोजगारी, खराब आरोग्य तसेच शिक्षणाच्या पायाभूत सुविधा या प्रदेशातील प्रमुख समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरले आहेत.