संपूर्ण देशात लोकसभा नविडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राधिका खेडा आणि शेखर सुमन यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.
काँग्रेसच्या राष्ट्रीय माध्यम समन्वयक राधिका खेडा यांनी, छत्तीसगड काँग्रेसच्या संपर्क विभागाचे अध्यक्ष सुशील आनंद शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला होता. सुशील यांनी आपल्याला मद्य ऑफर केले होते आणि रात्री उशिरा आपल्या रूमचा दरवाजा वाजवला होता, असा आरोप राधिका यांनी केला होता.
राजिनाम्यासंदर्भात बोलताना राधिका खेडा म्हणाल्या, काँग्रेस पक्ष रामविरोधी, सनातनविरोधी आणि हिंदूविरोधी आहे, असे मी नेहमीच ऐकत होते. मात्र, यावर विश्वास बसत नव्हता. महात्मा गांधीही प्रत्येक सभेची सुरुवात 'रघुपती राघव राजा राम' ने करत असत. मी माझ्या आजीसोबत राम मंदिरात गेले होते. तेथून परतल्यानंतर मी माझ्या घराच्या दारावर ‘जय श्री राम’ लिहिलेला झेंडा लावला. यानंतर, काँग्रेस पक्ष माझा द्वेश करू लागला. मी जेव्हा-जेव्हा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत होते, तेव्हा-तेव्हा मला खडसावले जात होते. एवढेच नाही तर, निवडणुका सुरू असताना मी अयोध्येला का गेले? असा प्रश्नही मला विचारण्यात आला.
याशिवाय, शेखर सुमन यांचीही ही दुसरी इनिंग असेल. यापूर्वी 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यांनी 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पटना साहिबमधून लोकसभा निवडणूकही लढली हेती. तेव्हा भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचा पराभव केला होता.