काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपाने निवडणूक जिंकली तर ते संविधान बदलतील असं म्हटलं आहे. मध्य प्रदेशातील रतलाम येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, निवडणुकीत जिंकलो तर संविधान बदलू, त्यामुळेच त्यांनी 400 जागांचा नारा दिला होता. भाजपा-एनडीएला 150 जागाही मिळणार नसल्याचा दावा राहुल यांनी केला.
ही निवडणूक देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक असल्याचं राहुल म्हणाले. "एका बाजूला नरेंद्र मोदी आणि आरएसएस आहेत, जे संविधान नष्ट करू पाहत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आहे, जी संविधान वाचवण्यात मग्न आहे. भाजपाच्या लोकांना संविधान रद्द करून गरीब, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून घ्यायचे आहे, मात्र आम्ही आरक्षण कधीच संपू देणार नाही, आरक्षणावरील 50 टक्के मर्यादाही आम्ही हटवणार आहोत" असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
राहुल गांधी यांनी हातात संविधान घेऊन लोकांना सांगितलं की, "पंतप्रधान मोदींना हे (संविधान) काढून टाकायचं आहे आणि त्यांना फक्त राज्य करायचं आहे. त्यांना तुमचे सर्व अधिकार काढून घ्यायचे आहेत. हे त्यांचे ध्येय आहे आणि आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आदिवासी, मागासवर्गीय आणि दलितांना जे काही अधिकार मिळाले ते याचे (संविधान) योगदान आहे."
"भाजपाच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, सत्तेत आल्यास ते हे बाजूला ठेवतील. त्यामुळेच त्यांनी 400 जागांचा नारा दिला आहे. त्यांना 150 जागाही मिळणार नाहीत. त्यांचे नेते सांगत आहेत. ते आरक्षण काढून घेतील, आम्ही दलित, मागासवर्गीय आणि गरिबांना जितकं आरक्षण हवंय ते देऊ" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.