Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागले. 400 पारची घोषणा करणाऱ्या भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. पण, मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात भाजपचेच सरकार येणार आहे. एकीकडे सरकार स्थापनेची तयारी सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालाच्या दिवशी शेअर बाजारातील प्रचंड घसरणीबाबत मोठा दावा केला आहे. बाजारातील घसरणीसाठी त्यांनी थेट नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जबाबदार धरले असून, जेपीसीची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांचे मतदान 1 जून 2024 रोजी संपले. मात्र त्याआधी अनेक मुलाखतीत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी, म्हणजेच 4 जून रोजी शेअर बाजारात विक्रमी वाढ होण्याची आशा व्यक्त केली होती. यानंतर 1 जून रोजी मतदानाचा सातवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल येऊ लागले आणि जवळपास सर्वच ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
एक्झिट पोलच्या दिवशी काय झाले?1 जून (शनिवार) रोजी एक्झिट पोल आला आणि सोमवार( 3 जून) रोजी शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक वाढ दिसून आली. 3 जून रोजी, म्हणजेच निवडणूक निकालाच्या आदल्या दिवसी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 2000 हून अधिक अंकांच्या उसळीसह उघडला आणि 76,738.89 च्या नवीन उच्चांकावर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 2507.47 अंकांच्या किंवा 3.39 टक्क्यांच्या वाढीसह 76,468.78 च्या पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्सप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 600 अंकांच्या वाढीसह उघडला आणि ट्रेडिंगच्या अल्पावधीत 23,338.70 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. पण, बाजार बंद होईपर्यंत हा 733.20 अंक किंवा 3.25 टक्क्यांच्या वाढीसह 23,263.90 वर बंद झाला. 3 जून रोजी बाजारातील या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी सुमारे 13 लाख कोटी रुपये कमावले होते.
4 जून रोजी काय झाले?4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल आले अन् बीएसई सेन्सेक्स दुपारी 12.20 पर्यंत 6094 अंकांनी घसरुन 70,374 च्या पातळीवर आला. दुसरीकडे, निफ्टी निर्देशांक सुमारे 1947 अंकांच्या मोठ्या घसरणीसह 21,316 च्या पातळीवर पोहोचला. कोरोनाच्या कालावधीनंतर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण होती. शेअर बाजारातील घसरणीमुळे बीएसईचे मार्केट कॅप एकाच दिवसात सुमारे 31 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
राहुल गांधींनी काय म्हटले?आता या बाजारातील घसरणीबाबत राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. गुरुवारी काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत शेअर बाजाराचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, बाजारातील घसरण हा शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून त्याची जेपीसी चौकशी व्हायला हवी. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांनी 4 जून रोजी शेअर बाजारात विक्रमी वाढ होण्याची अपेक्षा का व्यक्त केली होती? त्यांनी लोकांना शेअर्स खरेदी करण्यास का सांगितले? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.