लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले कॅबिनेट मंत्री किरोडीलाल मीणा यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. निवडणूक सभेला गर्दी नसल्याने किरोडीलाल मीणा हे इतके नाराज झाले की ते रागाच्या भरात तिथून निघून गेले. व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर मंत्र्यांची कार्यकर्त्यांशी बाचाबाची देखील झाली आहे.
राजस्थान सरकारचे मंत्री किरोडीलाल मीणा हे बस्सीच्या खोरी बालाजी मंदिराजवळ दौसा लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार कन्हैया लाल मीणा यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेण्यासाठी आले होते. मात्र सभेला गर्दी न झाल्याने मंत्री किरोडीलाल मीणा खूप नाराज झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारासचा आहे.
किरोडीलाल मीणा यांनी भाजपा अधिकाऱ्यांना खडसावलं आणि म्हणाले की, "तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी सभा घेतल्याची..." यानंतरही संतापलेले मंत्री व्यासपीठावरून खाली आले आणि म्हणाले की, - "चला आपल्या आपल्या घरी जावा, हेच माझं भाषण आहे, चलो... भागो... हटो..."
स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मंत्री किरोडीलाल मीणा म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रामाणिक व्यक्तीचा पराभव करून तुम्ही माझा सन्मान राखला नाही तर आता काय ठेवणार? मी पंतप्रधान मोदीजींना फोन करून सांगतो की बस्सीचे लोक पूर्णपणे वेडे झाले आहेत. यानंतर मंत्री किरोडीलाल संतापले आणि व्यासपीठावरून खाली आले आणि गाडीतून निघून गेले.