"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 11:45 AM2024-04-28T11:45:51+5:302024-04-28T11:48:31+5:30
Chhattisgarh Lok Sabha Election 2024: काँग्रेसने (Congress) यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामधील काही आश्वासनांवरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार वार-पलटवार होत आहेत. या क्रमात आता महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा (Alaka Lamba) यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलना ही थेट रावणाशी केली.
काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामधील काही आश्वासनांवरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार वार-पलटवार होत आहेत. या क्रमात आता महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलना ही थेट रावणाशी केली. रावणाने सीतेचं हरण केलं होतं. तर नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि मजुरांच्या अधिकारांचं हनन केलं. आमच्या मंगळसुत्राची चिंता करू नका. बेरोजगारीची चिंता करा.
छत्तीसगडमधील दुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र साहू यांचा प्रचार करण्यासाठी अलका लांबा इथे आल्या होत्या. त्यावेळी लांबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. केंद्रातील मोदी सरकारच्या सगळ्या योजना अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा केवळ एकाच रंगासाठी मत मागत आहेत. मात्र काँग्रेस तीन रंगांनी बनलेल्या तिरंग्यासाठी मत मागत आहे, असे सांगितले.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना करताना त्या म्हणाल्या की, लोक रावणाला मोठा ब्राह्मण मानतात. मात्र मला वाटतं रावणामध्ये १० दोष होते. त्याने सीतामातेचं अपहरण केलं. मर्यादा पुरुषोत्तम राम आणि संपूर्ण लंका सीतामातेसाठी सर्वस्वाचा त्याग करून लढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गरीब, मजुरांच्या अधिकारांचं हनन करून ते त्यांच्या धनाढ्य मित्रांकडे सोपवत आहेत. आता मी कुणासाठी काय म्हटलंय, हा फरक तुम्ही समजून घ्या, असे अलका लांबा म्हणाल्या.
यावेळी अलका लांबा यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यावरूनही नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत भ्रम पसरवत आहेत. आमच्या न्याय पत्राच्या एकाही पानावर हिंदू-मुस्लिम, दहशतवादाचं समर्थन आणि मुस्लिम लीग यासारखा एकही शब्द नाही आहे, असेही त्यांनी सांगितले.