Lok Sabha Election 2024 Result : गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा आहेत. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी येथील २५ जागांसाठी मतदान झालं होतं. विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी सुरतची जागा बिनविरोध जिंकल्यानं त्या ठिकाणी मतदान झालेलं नाही. राज्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने यावेळी 'इंडिया अलायन्स'अंतर्गत एकत्र निवडणूक लढवली.
आम आदमी पक्षानं भरूच आणि भावनगर मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले, तर उर्वरित २३ जागांवर काँग्रेसचे उमेदवार उभे राहिले. इथली सर्वात हॉट सीट आहे ती म्हणजे गांधीनगर. या ठिकाणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा सामना काँग्रेसच्या सोनल पटेल यांच्याशी आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये गांधीनगरमधून दुसऱ्या फेरीनंतर अमित शाह यांनी ९० हजार मतांची आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्येही त्यांनी लाखो मतांच्या फरकानं विजय मिळवला होता. तर दुसरीकडे राजकोटमधून भाजपचे पुरुषोत्तम रुपाला हे १२ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
२०१९ मध्ये काय होती स्थिती?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमधील सर्व २६ जागा जिंकल्या होत्या. गुजरातमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही. गुजरातमध्ये २०१४ मध्येही भाजपने लोकसभेच्या सर्व २६ जागा जिंकल्या होत्या. मात्र, २०२४ ची निवडणूक मागील दोन निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी आहे. यावेळीही भाजपसमोर लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे मोठं आव्हान आहे. आज मंगळवार, ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान २०१९ च्या लोकसभा निकालाची भाजप पुनरावृत्ती करणार का हे पाहावं लागणारे.