लखनौ - उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीला मोठा झटका बसताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलात भाजपासह सहकारी मित्रपक्षालाही नुकसान झालं आहे. अपना दल एस मिर्झापूर, रॉबर्टगंज लोकसभा मतदारसंघात पिछाडीवर आहे. तर सुभासपाला घोसी लोकसभा मतदारसंघात फटका बसला आहे. आतापर्यंतच्या कलात भाजपा अनेक जागांवर पिछाडीवर असल्याचं दिसून येते.
राज्यातील ८० जागांपैकी इंडिया आघाडीला ४२ जागांवर आघाडी मिळताना दिसते. तर भाजपा नेतृत्वातील एनडीएला ३७ जागांवर आघाडी आहे. एका जागेवर आझाद समाज पार्टीला बहुमत मिळताना दिसते. उत्तर प्रदेशातील निकालाने अनेकांना आश्चर्यचकीत केलं आहे. हे कल पाहून आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या एका विधानाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होणार असून योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं जाईल असा दावा केजरीवालांनी केला होता.
काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?
लखनौमध्ये इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठा दावा केला होता. मुख्यमंत्री योगी दिल्लीत आले होते. त्यांनी मला शिव्या दिल्या. परंतु योगीजी मी तुम्हाला सांगतो. तुमचे खरे शत्रू हे तुमच्याच पक्षात आहेत. स्वपक्षातील शत्रूंशी लढा. तुम्ही मला शिव्या का देताय असा सवाल केजरीवालांनी विचारला होता.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तुम्हाला हटवणार आहेत. तुम्हाला यूपीच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून हटवण्याची तयारी सुरू झाली आहे. तुम्ही त्यांच्याकडे पाहा. इंडियाला वाचवायचं असेल तर इंडिया आघाडीला जिंकवावं लागेल असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.
यूपीत बदल होणार?
यूपीत व्होटिंग पॅटर्नमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. याठिकाणी भाजपाला जबरदस्त फटका बसला आहे. याठिकाणी पक्षाला ३० पेक्षा अधिक जागांचे नुकसान होत आहे. तर काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होत आहे. तर समाजवादी पक्ष आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी करत आहे. १९९२ च्या समाजवादी पक्षाच्या स्थापनेनंतर आत्ताची ही सर्वात चांगली कामगिरी आहे. समाजवादी पक्ष ३५ जागांवर आघाडी आहे. इंडिया आघाडीची रणनीती ग्राऊंडवर उतरताना दिसत आहे. त्यामुळे भाजपा राज्याच्या नेतृत्वात बदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.