Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. पक्षाला एकट्याने बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे त्यांना आपल्या मित्रपक्षांची साथ लागणार आहे. या मित्रपक्षांमध्ये चंद्राबाबू नायडू यांचा TDP आणि नितीश कुमार यांचा JD(U) दोन अन् तीन नंबरचे मोठे पक्ष म्हणून समोर आले आहेत. एकूणच काय, तर हे दोन पक्ष सध्या 'किंग मेकर'च्या भूमिकेत आल्यामुळे त्यांची 'बार्गेनिंग पॉवर'देखील वाढली आहे. दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ची आज संध्याकाळी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत हे सर्व मित्रपक्ष भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न नक्कीच करतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश कुमारांच्या जेडीयूने 3 कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. याशिवाय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद हवे आहेत. तर, LJP (रामविलास) पक्षाचे प्रमुख चिराग पासवान 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाची मागणी करू शकतात. या सगळ्यात जीतन राम माझीदेखील स्वतःसाठी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मागण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, या सगळ्यात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील टीडीपी सर्वाधिक मागण्या करू शकतो. त्यांची सर्वात मोठी मागणी लोकसभा अध्यक्षपदाची असेल. याशिवाय, चंद्राबाबू 5 ते 6 मंत्रिपदे मागू शकतात. यामध्ये रस्ते वाहतूक, ग्रामीण विकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार, शेती, जलशक्ती, माहिती आणि प्रसारण, शिक्षण आणि अर्थ खात्याचा समावेश आहे.
नायडू विशेष दर्जा मागू शकतातमंत्रालयातील या मागण्यांशिवाय चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणीही करू शकतात. ही त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अशा राज्यांना विशेष दर्जा दिला जातो, जे देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत मागासलेले आहेत. तेलंगण वेगळे झाल्यापासून चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करत आहेत. हैदराबाद तेलंगणात गेल्यानंतर आंध्र प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला, असा त्यांचा यामागचा युक्तिवाद आहे.