“गरीब जनतेने संविधान वाचवले, मोदींचा पराभव दिसताच अदानींचे शेअर पडले”: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:51 PM2024-06-04T18:51:58+5:302024-06-04T18:54:27+5:30
Congress Rahul Gandhi Reaction Lok Sabha Election Result 2024: आम्ही इंडिया आघाडीतील पक्षांचा सन्मान केला. काँग्रेसने देशाला एक नवे व्हिजन दिले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचे कल हळूहळू स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे. देशात एनडीएला जनाधार मिळताना दिसत असला तरी इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. यातच इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला जात आहे. यातच हिंदुस्थानातील गरीब जनतेने संविधान वाचविण्याचे काम केले आहे, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होते. विशेष म्हणजे वायनाड आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी राहुल गांधी यांनी मोठ्या आघाडीसह विजय मिळवला. पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीतील पक्षांचे आभार मानले. राहुल गांधी म्हणाले की, इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष केवळ कोणत्या एका राजकीय पक्षाविरोधात लढली नाही. ही निवडणूक आम्ही भाजपा, देशातील संस्था, देशातील प्रशासकीय व्यवस्था, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी या सर्वांविरोधात लढलो होतो. या सगळ्या संस्थांवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कब्जा केला. धमकावले आणि घाबरवले, या शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले
ही लढाई संविधान वाचविण्याची होती
ही लढाई संविधान वाचविण्याची होती. मी तुम्हाला खरे सांगतो की, यांनी आमची बँक खाती गोठवली. मुख्यमंत्र्यांना कारागृहात डांबले. पक्ष फोडले. तेव्हा माझ्या मनात आले की, हिंदुस्थानची जनता संविधान वाचवण्यासाठी एकत्र येऊन लढेल. आणि ही गोष्ट खरी ठरली. हिंदुस्थानातील जनता, इंडिया आघाडीतील घटक सहयोगी पक्ष आणि काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते यांना मनापासून धन्यवाद देतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
अदानींचे शेअर आपण पाहिलेत का? नरेंद्र मोदी हरले, शेअर पडले
संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून पहिले पाऊल उचलले आहे. काँग्रेस पक्ष आणि पक्षनेत्यांनी इंडिया आघाडीतील पक्षांचा सन्मान केला. त्यांचा विचारांचा सन्मान केला. तसेच ज्या ठिकाणी लढलो, ते एकत्रितपणे लढलो. काँग्रेसने स्पष्टपणे देशाला एक नवे व्हिजन दिले आहे, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. तसेच अदानींचे शेअर आपण पाहिलेत का? इंटरेस्टिंग गोष्ट अशी की, जनता मोदी आणि अदानी यांना थेट संबंध जोडते आहे. मोदींचा पराभव होतो, तेव्हा शेअर मार्केट दाखवून देते की, मोदींचा पराभव झाला, तर अदानींचे शेअर्सही गेले. हा भ्रष्टाचाराचा थेट संबंध आहे. देशाने नरेंद्र मोदी यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, आम्ही तुम्हाला पसंत करत नाही. या देशातील जनतेचा मला अभिमान आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संविधान वाचवायचे काम हिंदुस्थानातील सर्वांत गरीब जनतेने केले आहे. मजूर, शेतकरी, दलित, आदिवासी, मागासवर्ग समाजाने केले आहे. हे संविधान देशाचा आवाज आहे. मी त्यांना धन्यवाद देतो आणि आश्वस्त करतो की, काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत उभा आहे. जी वचने आम्ही दिली होती, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. जातनिहाय जनगणना, महालक्ष्मी या गोष्टींची अंमलबजावणी करणार आहोत, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.