पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने पैकीच्या पैकी म्हणजे २६ जागा जिंकल्या होत्या. यावेळीही गुजरातमध्ये पैकीच्या पैकी जागा जिंकण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र यावेळी भाजपाला एका जागेवर पराभवाचा धक्का बसला आहे. गुजरातमधील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बनासकांठा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं पुन्हा एका आपलं वर्चस्व मिळवलं आहे. येथून काँग्रेसच्या उमेदवार जेनीबेन ठाकोर यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.
गुजरातमधील बनासकांठा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या रेखाबेन चौधरी आणि काँग्रेसच्या जेनीबेन ठाकोर यांच्यामध्ये लढत झाली. दरम्यान, मतमोजणीमधून आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार काँग्रेसच्या जेनीबेन ठाकोर यांनी ६ लाख ७१ हजार ८८३ मतं घेतली आहेत. तर भाजपाच्या रेखाबेन चौधरी यांना ६ लाख ४१ हजार ४७७ मिळाली आहेत. येथून जेनीबेन ठाकोर यांनी ३० हजार ४०६ मतांची आघाडी घेतली आहे. तसेच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाने ९३ जागांवर विजय मिळवला असून, १४६ जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण २३९ जागा भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. तर विजय मिळवलेल्या आणि आघाडी घेतलेल्या अशा मिळून २९४ जागांवर एनडीएकडे आघाडी आहे.
दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंत ३८ जागा जिंकल्या असून, ६१ जागांवर आघाडी आहे. अशा प्रकारे काँग्रेसच्या खात्यात ९९ जागा जाण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडी ही २३१ जागांवर आघाडीवर आहे.