लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. पहिल्या दोन टप्प्यात राजस्थानमधील सर्व 25 लोकसभा जागांवर मतदान पार पडलं. अशा परिस्थितीत आता राजस्थानमधील प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांचं लक्ष इतर राज्यांकडे लागलं आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मोठं विधान केलं आहे.
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये यावेळी काँग्रेसलाभाजपापेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. सचिन पायलट यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी खास संवाद साधताना ही माहिती दिली. भाजपावर जोरदार निशाणा साधत ते म्हणाले की, "जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात."
भाजपाच्या 400 चा आकडा पार करणार असल्याच्या दाव्याबाबत देखील काँग्रेस नेत्याने भाष्य केलं आहे. आधी काँग्रेसचा पराभव व्हायचा तेव्हा 20-21 जागा किंवा 50-55 जागा मिळत होत्या, मात्र यावेळी 70 जागा मिळाल्या आहेत. यावरून काँग्रेसची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचं स्पष्ट होतं असंही सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.
राजस्थानमधील काँग्रेस उमेदवारांच्या यादीवर पायलट यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. ज्या दहा उमेदवारांची नावं पुढे आली आहेत ते सर्व विजयी उमेदवार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच "हरियाणातील विद्यमान लोकसभा खासदार भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. राजस्थानमध्येही एका विद्यमान खासदाराने भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विद्यमान आमदार, खासदार आमच्याकडे येत आहेत."
"भाजपामध्ये जाणारे माजी आमदार आहेत, त्यामुळे लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे. जे काँग्रेसची विचारधारा स्वीकारत आहेत आणि आमच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहेत, त्यांचे पक्षात स्वागत केले जात आहे आणि त्यांना संधी दिली जात आहे. मला आनंद आहे की पक्षाने त्यांची कामगिरी ओळखली आहे" असं देखील सचिन पायलट यांनी म्हटलं होतं.