निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. आमची टीम निवडणुकीसाठी सज्ज आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याआधी राजीव कुमार यांनी निवडणुकीची तयारी कशी केली आहे हे सांगितलं. यावेळी त्यांनी मतदारांच्या संख्येसह निवडणुकीसंदर्भात आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, भारताच्या निवडणुकांवर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. मतदारांची माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, देशात एकूण मतदारांची संख्या 96.8 कोटी आहे. त्यापैकी 49.7 कोटी पुरुष आणि 47 कोटी महिला आहेत. यावेळी 1.82कोटी मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. 12 राज्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. आमचे वचन आहे की आम्ही अशा प्रकारे राष्ट्रीय निवडणुका घेऊ ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर चमकू शकेल.
निवडणुकीसाठी 27 एप्स आणि पोर्टल तयार
निवडणुकीच्या तयारीची माहिती देताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, 1.5 कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी कार्यक्षमतेने काम करतात. यावेळीही निवडणूक घेण्याची जबाबदारी याच लोकांच्या खांद्यावर असेल, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी 27 एप्स आणि पोर्टल तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती cVigil एपद्वारे दिली जाऊ शकते आणि तत्काळ कारवाई केली जाईल.
97 कोटी मतदार, 55 लाख EVM
राजीव कुमार म्हणाले की, नोंदणीकृत मतदारांची संख्या अंदाजे 97 कोटी आहे. 10.5 लाख मतदान केंद्रे आहेत जिथे मतदान होणार आहे. 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाईल, तर अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी 4 लाख वाहनांचा वापर केला जाईल. यावेळी 1.8 कोटी मतदार प्रथमच मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 20 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 19.47 कोटी आहे. देशात 12 राज्ये अशी आहेत जिथे महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे.
मतदान केंद्रावर कोणत्या सुविधा असणार?
अपंगांसाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा करण्यात आल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. गर्भवती महिलांसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. अपंगांसाठी केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी, शौचालय आणि व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की, पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत निवडणुकांसाठी निवडणूक आयोग संवेदनशील आहे. सिंगल यूज प्लास्टिक कमी करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत पर्यावरणपूरक पावलं उचलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
चार विधानसभांचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबतही माहिती देण्यात आली. राजीव कुमार म्हणाले की, देशाला खऱ्या अर्थाने उत्सवपूर्ण, लोकशाही वातावरण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत.