- संजय शर्मानवी दिल्ली - भाजपचा निवडणूक जाहीरनामा अर्थात ‘मोदींची गॅरंटी’ काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यापासून प्रेरित असेल. आरोग्य विम्यासाठी आयुष्मान योजनेची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यासह किसान सन्मान निधीची रक्कम वाढविणे आणि महिलांना १,००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देणे यासारख्या घोषणांचाही मोदींच्या गॅरंटीमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
भाजप निवडणूक जाहीरनामा समितीच्या गुरुवारी झालेल्या दुसऱ्या बैठकीत महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब अशा चार श्रेणींसाठी वेगवेगळ्या योजनांच्या सूचनांवर विचार करण्यात आला. मोदींनी या चार घटकांच्या कल्याणावर आपला सर्वाधिक भर राहणार असल्याचे सूतोवाच यापूर्वीच केले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावरही चर्चा झाली.
गृहपाठ झाला; लवकरच शिक्कामोर्तबजाहीरनाम्यावर गृहपाठ झाला आहे. आता काँग्रेसचा जाहीरनामा पाहावा लागेल, त्यानंतर काही बदल होऊ शकतात, असे समितीच्या सदस्याने सांगितले. मसुदा अंतिम झाल्यानंतर राजनाथ सिंह तो पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सोपवतील. श्रेष्ठींच्या मंजुरीनंतर पुढील आठवड्यात तो प्रसिद्ध होईल, असे ते म्हणाले.