काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठीत राहुल गांधींनास्मृती इराणींकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी काँग्रेसने येथून गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय केएल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. स्मृती इराणींना अमेठीतून पुन्हा विजयाची आशा आहे. एका रॅलीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. स्मृती इराणी म्हणाल्या की, "आतापर्यंत मी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवत असे, पण आता एका पाकिस्तानी नेत्याने स्मृती इराणींचा पराभव करायला हवा, असं म्हटलं आहे."
"मी विचार केला, तुम्ही पाकिस्तानला सांभाळू शकत नाही आणि तुम्ही अमेठीची चिंता करत आहात? जर माझा आवाज पाकिस्तानी नेत्यापर्यंत पोहोचत असेल, तर मला सांगायचे आहे की, ही अमेठी आहे, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एके 203 रायफलची फॅक्टरी बनवली आहे. त्या रायफलचा वापर सीमेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांना मारण्यासाठी गेला जात आहे. आज मला विचारायचं आहे की, पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे? देशात निवडणुका सुरू आहेत" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये राहुल गांधींचं कौतुक केलं होतं. तेव्हापासून राहुल गांधी या मुद्द्यावरून भाजपाच्या निशाण्यावर आहेत. मोदींसह बहुतेक नेत्यांनी त्यांच्या ‘पाकिस्तान कनेक्शन’वर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि पाकिस्तान यांच्यात "भागीदारी" असल्याचा आरोप केला होता आणि ते आता "पूर्णपणे उघड" झाल्याचं म्हटलं होतं.
"तुम्हाला कळलं असेल की एक पाकिस्तानी नेता काँग्रेससाठी प्रार्थना करत आहे. पाकिस्तान राजपुत्राला (राहुल गांधी) पंतप्रधान करण्यासाठी अधीर आहे... आणि आम्हाला माहीत आहे की काँग्रेस पाकिस्तानची अनुयायी आहे" असं मोदींनी म्हटलं होतं. वायनाडमधून निवडणूक लढवत असलेल्या राहुल गांधींना गेल्या आठवड्यात रायबरेलीमधून उमेदवार घोषित करण्यात आले. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
राहुल गांधी पुन्हा अमेठी जिंकण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा होती, जिथून ते तीन वेळा विजयी झाले आहेत. अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयाला काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी धोरणात्मक पाऊल म्हटलं आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला. राहुल गांधींनी पळून जाऊ नये, घाबरू नये, असं म्हटलं आहे.