…म्हणून या राज्यात काँग्रेसचे आमदार आणि मंत्री लोकसभा निवडणूक लढवण्यास देताहेत नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 04:40 PM2024-03-17T16:40:51+5:302024-03-17T16:43:22+5:30
Lok Sabha Election 2024: पक्षाकडून काही आमदार आणि मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसला अनेक मतदारसंघात निवडून येतील अशा उमेदवारांची निवड करण्यात अडचणी येत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली असून, देशभरात आचारसंहिताही लागू झाली आहे. सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र गेल्यावर्षी ज्या राज्यात प्रचंड बहुमतासह सरकार स्थापन केलं. त्या कर्नाटकमध्येकाँग्रेससमोर वेगळीच समस्या उभी राहिली आहे. कर्नाटकमध्ये भाजपा आणि जेडीएसच्या आघाडीला आव्हान देण्यासाठी काँग्रेस निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहे. राज्यात काँग्रेसने ७ उमेदवारांची घोषणाही केली आहे. मात्र उर्वरित २१ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात अडचणी येत आहेत. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत एकाही मंत्री किंवा आमदाराला उमेदवारी दिलेली नाही. पक्षाकडून काही आमदार आणि मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसला अनेक मतदारसंघात निवडून येतील अशा उमेदवारांची निवड करण्यात अडचणी येत आहेत.
कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी नुकतेच सांगितले होते की, पक्षाकडून ७ ते ८ मंत्र्यांना उमेदवार बनवण्याची तयारी सुरू आहे. मात्र काही मंत्री स्वत: निवडणूक लढण्याऐवजी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्यास सांगत आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर मंत्र्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी भीती काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाला वाटत आहे.
पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, मंत्र्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी निर्णय घेतील. दरम्यान, काँग्रेसचे कर्नाटकमधील दिग्गज नेते डी. केश शिवकुमार यांनी सांगितले की, उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. १९ मार्च रोजी उनेदवारांबाबत निर्णय घेण्यासाठी आमची बैठत होणार आहे. १९ मार्च रोजी रात्री किंवा २० मार्च रोजी सकाळी उमेदवारांची घोषणा होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस कर्नाटक सरकारमधील मंत्री के.एच. मुनियप्पा यांना कोलार, एच.सी. महादेवप्पा यांना चामराजनगर, सतीश जारकीहोळी यांना बेळगाव, बी. नागेंद्र यांना बेल्लारी, कुष्णा बायरे गौडा यांना बंगळुरू उत्तर आणि ईश्वर खांद्रे यांना बिदर येऊन उमेदवारी देण्याचा विचार करत आहे.मात्र यामधील एकही मंत्री निवडणूक लढवण्यास इच्छूक नाही आहे. मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी काँग्रेसने डी. के. शिवकुमार यांच्यावर सोपवली होती. मात्र त्यांच्याकडून मिळालेला अहवाल सकारात्मक नव्हता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यावेळी मल्लिकार्जुन खर्गे, वीरप्पा मोईली आणि मुनियप्पा हे काँग्रेसचे दिग्गज नेतेही पराभूत झाले होते.