नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रचारात उमेदवारांना पक्षकार्यकर्ते, नेते यांना नाश्ता, जेवण आदी गोष्टी द्याव्या लागतात. त्यासाठी खर्चाची मर्यादा विविध जिल्ह्यांतील निवडणूक पॅनेलने ठरवून दिली असून त्यातील विविध खाद्यपदार्थांचे दर वेगवेगळे आहेत. पंजाब जालंधरमधील उमेदवार चहा, समोसासाठी प्रत्येकी १५ रुपये उमेदवाराला खर्च करता येतील, तर मध्य प्रदेशमध्ये चहा, समोसासाठी अनुक्रमे ७ रुपये व ७ रुपये ५० पैसे असा दर निवडणूक पॅनेलने निश्चित केली आहे.
लोकसभेच्या निवडणूक प्रचारात उमेदवाराने प्रत्येक खाद्यपदार्थांवर किती रुपये खर्च करावेत, हे जिल्हा निवडणूक पॅनेल ठरवत आहे. जालंधरमध्ये छोले भटुरेसाठी ४० रुपये किंमत जिल्हा निवडणूक पॅनेलने निश्चित केली आहे. उमेदवाराला निवडणूक खर्चाच्या हिशेबात याच किमती नमूद कराव्या लागणार आहेत. मिठाईपैकी धोधा (प्रतिकिलो ४५० रुपये), घी पिन्नी (प्रतिकिलो ३०० रुपये), लस्सी व लिंबू पाणी प्रत्येकी अनुक्रमे २० रुपये, १५ रुपये अशा आकारण्यात आल्या आहेत.
मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये चहाचा दर सर्वांत कमी म्हणजे ५ रुपये ठरविण्यात आला आहे. तेथील जिल्हा निवडणूक पॅनेलने इडली, सांबार वडा, पोहा-जिलेबी यांचा दर प्रत्येकी २० रुपये, डोसा, उपमाचा दर प्रत्येकी ३० रुपये ठरविला आहे. मणिपूर येथील थौबल जिल्ह्यात चहा, समोसा, कचोरी, खजूर आदींचा दर प्रत्येकी १० रुपये निश्चित करण्यात आला आहे.
हेलिपॅड, प्रचाराच्या वाहनापर्यंतचे भाडे ठरलेलोकसभा, विधानसभा निवडणुकांकरिता जिल्हा निवडणूक पॅनेलने हेलिपॅड, लक्झरी वाहने, फार्म हाऊस, फुले, कूलर, टॉवर एसी, सोफा आदींचे दरही ठरवून दिले आहेत. यातील काही गोष्टी भाड्याने घ्याव्या लागतील किंवा फुलांसारख्या गोष्टी खरेदी कराव्या लागणार आहेत. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या टाटा सफारी किंवा स्कॉर्पिओ, होंडा सिटी, सियाझ, बस, बोट यांचेही भाडे निवडणूक पॅनेलने निश्चित केले आहे. त्यानुसारच उमेदवाराला निवडणूक खर्चात हिशेब द्यावा लागेल. पुष्पगुच्छ, गुलाबाच्या, झेंडूच्या फुलांच्या हारांचे दरही वेगवेगळे आहेत.