देशात लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे, एनडीए आणि इंडिया आघाडीने उमेदवारांची घोषणा केली आहे. काही राज्यात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही केली आहे, अर्ज दाखल करत असताना उमेदवारांना त्यांच्या संपत्तीची माहिती द्यावी लागते. यामुळे आता राजकीय नेत्यांच्या संपत्तीची माहिती समोर येत आहे. आज गोव्यातील भाजपा महिला उमेदवाराची संपत्ती समोर आली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
गोव्यात भाजपाने उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांच्या पत्नी पल्लवी डेम्पो यांना दक्षिण गोवा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पल्लवी डेम्पो यांनी मंगळवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. रिटर्निंग ऑफिसरसमोर दाखल केलेल्या ११९ पानांचे प्रतिज्ञापत्र दाखवते की, त्यांचे पती श्रीनिवास डेम्पो यांच्यासह त्यांची एकूण संपत्ती सुमारे १,४०० कोटी रुपये आहे.
२५५.४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता
डेम्पो ग्रुपचा व्यवसाय फ्रँचायझी फुटबॉल लीगपासून रिअल इस्टेट, जहाजबांधणी, शिक्षण आणि खाण व्यवसायापर्यंत विस्तारलेला आहे. पल्लवी डेम्पो यांच्या प्रतिज्ञापत्रात तिच्याकडे २५५.४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे दिसून येते, तर श्रीनिवास डेम्पो यांच्या मालकीच्या मालमत्तेचे मूल्य ९९४.८ कोटी रुपये आहे. पल्लवी डेम्पो यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य २८.२ कोटी रुपये आहे, तर श्रीनिवास डेम्पो यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य ८३.२ कोटी रुपये आहे. श्रीनिवास डेम्पो यांच्या गोवा आणि देशाच्या इतर भागांमध्ये असलेल्या मालमत्तांव्यतिरिक्त, यांच्या दुबईमध्ये एक अपार्टमेंट देखील आहे, याचे सध्याचे बाजार मूल्य २.५ कोटी रुपये आहे. याशिवाय लंडनमध्येही १० कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे.
तीन मर्सिडीज बेंझ कार
पल्लवी डेम्पो यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे वेगवेगळ्या सीरिजच्या तीन मर्सिडीज बेंझ कार आहेत, याची किंमत अनुक्रमे १.६९ कोटी, १६.४२ लाख, २१.७३ लाख रुपये आहे. कॅडिलॅक कार आहे, याची किंमत ३० लाख आहे. महिंद्रा थार एसयूव्ही आहे ज्याची किंमत १६.२६ लाख रुपये आहे. पल्लवी डेम्पो यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ५.७ कोटी रुपयांचे सोने असल्याची माहिती दिली आहे. पल्लवी डेम्पो यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी १० कोटी रुपयांचे आयकर रिटर्न भरले, तर श्रीनिवास डेम्पो यांनी २०२२-२३ वर्षासाठी ११ कोटी रुपयांचे रिटर्न भरले.
२१७.११ कोटींचे बॉन्ड
पल्लवी डेम्पो यांच्याकडे २१७.११ कोटी रुपयांचे रोखे आहेत. त्यांनी एमआयटी, पुणे विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा लोकसभा जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. पल्लवी डेम्पो यांच्यासोबत भाजपाचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनीही मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.