दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी गुरुवारी गुजरातमधील बोटादमध्ये मोठा रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत भावनगरचे आपचे उमेदवार उमेश मकवाना आणि आपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष इशुदान गढवी उपस्थित होते.
रोड शो दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, "माझ्या पतीला जबरदस्तीने जेलमध्ये टाकण्यात आलं आहे. गुजरातमध्ये चैतरला पण जेलमध्ये टाकलं होतं. तपास सुरू आहे असं सांगतात. म्हणजे काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का? तपास सुरू असेपर्यंत त्यांना जेलमध्ये ठेवलं जातं. ही हुकूमशाही आहे."
"अरविंद केजरीवाल हे देशभक्त आहेत, ते आयटी कमिश्नर होते. पण त्यांना समाजसेवा करायची होती. नोकरी सोडली. मला समाजसेवा करायची आहे, त्याचा तुला काही त्रास तर नाही ना? असा प्रश्न मला विचारला. त्यांनी अनेकदा उपोषण केलं. त्यांना डायबेटीस आहे. जेलमध्ये त्यांना इन्सुलिन दिलं जात नाही. अशा स्थितीत त्यांची किडनी लिव्हर खराब होईल."
"दिल्लीने त्यांना तीनदा मुख्यमंत्री केलं. तुम्ही (गुजरात) 5 आमदार दिले. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, पण ते 'शेर' आहे" असं देखील सुनीता केजरीवाल यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांना ED ने 21 मार्च रोजी दिल्ली दारू धोरणाच्या मुद्द्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. हे आरोप फेटाळून लावणाऱ्या 'आप'ने दिल्लीतील नेतृत्वात बदल होणार नसून मुख्यमंत्री केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवतील असं सांगितलं आहे.