Lok Sabha Election 2024 ( Marathi News ): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांत प्रचारसभांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया विरुद्ध एनडीए असा मोठा सामना पाहायला मिळू शकतो, असा कयास बांधला जात आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी थेट मतदान करून निवड करायची झाल्यास कोण देशाची पसंती असेल, याबाबत कल जाणून घेण्यात आला. यातील आकडेवारी धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणूक जिंकून भाजपा तिसऱ्यांदा केंद्रातील सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांची I.N.D.I.A आघाडी भाजपाला शह देण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार आहे. विरोधकांनी पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, यावर शिक्कामोर्तब केले नसले तरी, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात चुरस पाहायला मिळू शकते, असे म्हटले जात आहे. एका सर्व्हेत जनतेला विचारले की, जर थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर ते कोणाला निवडतील? यावर देशवासीयांनी आश्चर्यकारक उत्तरे दिल्याचे बोलले जात आहे.
नरेंद्र मोदी की राहुल गांधी? PM निवडीबाबत देशवासीयांची ‘मन की बात’
थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर तुम्ही कोणाला निवडाल? या प्रश्नाला उत्तर देताना ५९ टक्के लोकांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक संधी देणार असल्याचे सांगितले. तर, ३२ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी पसंदी दर्शवली. या दोघांपैकी एकाची निवड करणार नाही, असे ४ टक्के लोकांनी म्हटले आहे. तर, ५ टक्के लोकांनी या प्रश्नाचे उत्तर ‘माहिती नाही’ असे दिल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांच्या कामगिरीबद्दल विचारले असता, ३९ टक्के लोकांनी ‘असमाधानी’ असल्याचे सांगितले. २६ टक्के लोकांनी ‘खूप समाधानी’ असल्याचे म्हटले आहे. तर २१ टक्के लोकांनी ‘कमी समाधानी’ असल्याचे सांगितले. १४ टक्के लोकांनी ‘काही माहिती नाही’ असे उत्तर दिले. सी-व्होटरने याबाबत सर्व्हे केल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचा मंत्र देताना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. गरीब, शेतकरी, महिला व युवकांवर लक्ष केंद्रित करून पक्षाची मते वाढवावीत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. श्रीराम मंदिर आंदोलन भाजपाने हाती घेतलेले मोठे आंदोलन आहे. श्रीराम मंदिराचा मुद्दा २०२४ च्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.