लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज झालं आहे. बिहारमधील चार जागांवरही मतदान झालं. याबाबत पक्ष आणि विरोधक दोघांचेही आपापले विजयाचे दावे आहेत. चारही जागांवर आम्ही प्रचंड मतांनी विजयी होऊ, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांना जनता आता कंटाळली आहे. सध्याच्या सरकारवर सर्वांचाच राग आहे.
तेजस्वी यादव म्हणाले की, "आज आम्ही पहिल्या टप्प्यात सर्व 4 जागा जिंकत आहोत. आम्हाला मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला विश्वास वाटतो. बिहारमधील जनता सध्याच्या सरकारवर नाराज आहे. नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. 2019 मध्ये जे आश्वासन दिले होते ते पूर्ण झाले नाही; आता आमच्या मतदारांमध्ये कोणताही संभ्रम नाही. आम्ही पहिल्या टप्प्यातील चारही जागा जिंकत आहोत."
राहुल गांधींच्या ट्विटवर त्यांनी प्रतिक्रिया देत ते बरोबर असल्याचं म्हटलं आहे. मोदीजींची गॅरंटी, भाजपाचे नेते काय बोलत आहेत, हे जनता पाहत आहे. निवडणूक सभेसाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांवर ते म्हणाले की, मुख्यमंत्री आज निवडणूक सभेसाठी रवाना झाले आहेत, ते घरी बसले होते हे चांगलं नाही. आम्ही त्याचा आदर करतो. मात्र, लोकसभा निवडणुकीबाबत दोन्ही आघाड्यांचे आपापले दावे असले तरी जनतेच्या मनात काय आहे आणि जनता यावेळी कोणाला निवडून देते हे निवडणूक निकालच सांगतील.