Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान झाले असून, आगामी मतदानासाठी सर्व नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज रायबरेली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ज्या सत्तेला सोनिया गांधी यांनी नाकारले, त्या सत्तेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी डोळे लावून बसले आहेत, असे खरगे म्हणाले.
खरगे पुढे म्हणतात, आज देशभात अनक भुकेल्यांना जेवण मिळत नाही, जेवणाची काही व्यवस्था करावी. अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही, नोकरीची काही व्यवस्था करावी. पण, मोदींचे या मुद्द्यांकडे नाही, तर फक्त सत्तेवर लक्ष आहे. 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव झाला, तेव्हा सोनिया गांधींनी आपल्या मित्रपक्षांच्या इच्छेविरुद्ध पंतप्रधान होण्यास नकार दिला आणि काँग्रेसच्या वतीने मनमोहन सिंग यांचे नाव पुढे केले. ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्यावर मोदींचा डोळा आहे, अशी टीका खरगेंनी केली.
ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे, देशाचे भविष्य घडवणारी निवडणूक आहे. देशातील दलित, मागासलेले, आदिवासी, गरीब, शेतकरी यांना वाचवण्याची ही निवडणूक आहे. यात जर काही चूक झाली तर या देशात मनु जन्माला येईल आणि मनुस्मृतीची राजवट चालेल आणि संविधानाची राजवट संपेल.मोदी आणि भाजपला परत आणण्याचा प्रयत्न म्हणजे दलित, मागासवर्गीय, आदिवासी, गरीब आणि शेतकरी यांचा विश्वासघात आहे. चुकूनही कोणी भाजपला मत दिले, तर ते अनुसूचित जाती, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या विरोधात मतदान असेल, असेही खरगे यावेळी म्हणाले.