विभाष झा
पाटणा : राज्यात एकूण सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा लोकमत न्यूज नेटवर्क निवडणुकीचे दोन टप्प्यांतील मतदान संपले आहे. रॅली, प्रचारसभा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मात्र राज्यातील मतदारांची मनःस्थिती कोणत्याही पक्षाला कळण्याच्या पलीकडे गेली आहे. गर्दी पाहून काही नेत्यांना आनंद होत आहे, तर ज्यांच्या सभांना गर्दी जमत नाही, त्यांना तणाव जाणवत आहे. त्यातच मतदानाचे प्रमाण यावेळी कमी झाले आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांची धाकधुक वाढली आहे.
४९.२६% मतदान पहिल्या टप्प्यात झाले होते.
५९.४५% मतदान दुसऱ्या टप्प्यात झाले.
झांझारपूर, मधेपुरा आणि कटिहार, अररिया आणि खगरिया या जागांवर तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात एनडीएला टक्कर
तिसऱ्या टप्प्यात कटिहार, मधेपुरा आणि झांझारपूरमध्ये जदयूला कडवी स्पर्धा आहे. यामागे विद्यमान खासदारांची परिसरातील जनतेपासून असलेली अलिप्तता असल्याचे मानले जात आहे. झांझारपूरमध्ये तिरंगी लढत आहे. त्याचबरोबर कटिहार जागेवर काँग्रेसची एकजूट आहे.
नितीशकुमारांचा आलेख घसरता?
• बिहारमध्ये नितीशकुमार यांचा आलेख झपाट्याने घसरत असल्याचे बोलले जात आहे. जदयू नेत्यांना सभेत बोलण्यासारखे फारसे नसते. राजदच्या काळात असलेले जंगलराज आणि गेल्या १८ वर्षांत केलेल्या कामांचीच मोजणी जदयूचे नेते करताना दिसतात.
● नवीन कामांबाबत कोणतीही चर्चा होत नाही. नव्या चेहऱ्याबाबत मतदारांमध्येही उत्सुकता आहे. जुन्या चेहऱ्याऐवजी नव्या चेहऱ्याला मतदार पसंती देतील, अशी अपेक्षा विश्लेषकांनी बोलून दाखवली.