लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडले. पण, नागालँडमध्ये एक विचित्र स्थिती बघायला मिळाली. येथील 6 जिल्ह्यांमध्ये आज शून्य मतदानाची नोंद झाली. याचे कारण म्हणजे, ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन (ईएनपीओ) नावाची संघटना. ही संघटना राज्यात अधिक आर्थिक स्वायत्ततेसह राज्यात स्वतंत्र प्रशासनाची मागणी करत आहे. या संघटनेने निवडणुकीपूर्वी सार्वजनिक आणीबाणी जाहीर करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, याचा परिणाम आज झालेल्या मतदानावर दिसून आला.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मागितला उत्तर -नागालँडमध्ये लोकांना मतदान करण्यापासून रोखल्याबद्दल, ईशान्येकडील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ENPO ला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. आपल्या नोटीशीत निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्यामागचे कारण विचारले आहे. तसेच, योग्य उत्तर न मिळाल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला आहे.
'कुणालाही जबरदस्ती केली नाही' -या नोटिशीला ENPO ने देखील उत्तर दिले आहे. हा लोकांचा ऐच्छिक निर्णय होता. यासाठी कुणालाही जबरदस्ती करण्या आली नाही. असे करणे गुन्हा नाही. यामुळे निवडणूक आयोगाचे कलम 171 सी यासाठी लागू होत नाही. तसेच, बहुदा आयोगाचा काही गैरसमज झाला असावा आणि आपण या मुद्द्यांवर निवडणूक आयोगाला सहकार्य करण्यास तयार आहोत. असेही संघटनेने म्हटले आहे.
ENPO नं आमदारांसोबत केली होती बैठक - ENPO ने आपल्या मागण्यांना घेऊन 30 मार्चला ईस्टर्न नागालँड एमएलए असोसिएशनसोबत दीर्घकाळ बंद दाराआड चर्चा केली होती. या बैठकीत असोसिएशनचे सर्व 20 आमदार उपस्थित होते. यावेळी संघटनेने लोकसभा निवडणुकीपासून दूर राहण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चारही केला होता. यावर संबंधित आमदारांनी या निर्णयावर फेरविचार करण्याचे आवाहन त्यांना केले होते. मात्र ENPO ने ऐकले नाही. आमदारांसोबतच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी ENPO ने निवडणूक आयोगालाही आपल्या निर्णयाची माहिती दिली होती.