अठराव्या लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सर्व राजकीय पक्षांचे मिळून तब्बल ८ हजार ३६० उमेदवार रिंगणात आहेत. यामधील काही उमेदवार अतिप्रचंड श्रीमंत आहेत. तर काही मोजके उमेदवार गरीबही आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रांमधून त्यांच्याकडील संपत्तीचा आकडा समोर येत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवत असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण असा प्रश्नही अनेकांना पडलेला आहे. लोकसभा निवडणूक लढवत असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार हा काँग्रेस किंवा भाजपा ह्या राष्ट्रीय पक्षांचा नाही. तर आंध्र प्रदेशमधील तेलुगू देसम या पक्षाचा आहे.
तेलुगू देसम पक्षाकडून आंध्र प्रदेशमधील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले चंद्रशेखर पेम्मासानी हे लोकसभा निवडणूक लढवत असलेले देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. चंद्रशेखर पेम्मासानी यांच्याकडे तब्बल ५ हजार ७०५ कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. ही संपत्ती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लढत असलेल्या ८ हजार ३६० उमेदवारांमध्ये सर्वाधिक आहे.
दरम्यान, तेलंगाणामधील चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत असलेले कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी ४ हजार ५६८ कोटी एवढी संपत्ती घोषित केली आहे. तर दक्षिण गोव्यातील भाजपा उमेदवार पल्लवी डेम्पो यांनी १ हजार ३६१ कोटी रुपये एवढी संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. एडीआरच्या विश्लेषणानुसार हरियाणामधील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपा उमेदवार नवीन जिंदल यांच्याकडे १ हजार २४१ कोटी एवढी संपत्ती आहे. तर मध्य प्रदेशमधील छिंडवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नकूलनाथ यांच्याकडे ७१६ कोटी रुपये एवढी संपत्ती आहे.