मॅच फिक्सिंग करून निवडणूक जिंकण्याचा हाेताेय प्रयत्न, इंडिया आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधी यांचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:24 AM2024-04-01T10:24:41+5:302024-04-01T10:25:09+5:30

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा  प्रयत्न करीत असल्याचे सारा देश आणि भाजपचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

lok sabha election 2024: This is an attempt to win elections by fixing matches, Rahul Gandhi accused BJP in the rally of India Aghadi. | मॅच फिक्सिंग करून निवडणूक जिंकण्याचा हाेताेय प्रयत्न, इंडिया आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधी यांचा भाजपवर आरोप

मॅच फिक्सिंग करून निवडणूक जिंकण्याचा हाेताेय प्रयत्न, इंडिया आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधी यांचा भाजपवर आरोप

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा  प्रयत्न करीत असल्याचे सारा देश आणि भाजपचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणूक आयोगातील दोन पंचही त्यांनीच निवडले. सामना सुरु होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करुन तुरुंगात टाकले. ही मॅच फिक्सिंग मोदी आणि भारतातील तीनचार सर्वात मोठे उद्योगपती करीत आहेत, अशी टीका काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. 

‘इंडिया’ आघाडीच्या जाहीर सभेत राहुल गांधी बाेलत हाेते. केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले, मॅच फिक्स करून चारशे जागा जिंकताच आम्ही संविधान बदलू, असे भाजपच्या एका खासदाराने म्हटले. ही लढाई संविधान वाचविण्याची आहे.ही निवडणूक सामान्य नाही. हिंदुस्थान, संविधान, गरीब, शेतकरी, मागासवर्गीय, आदिवासींचे हक्क वाचविण्याची निवडणूक आहे. ज्या दिवशी संविधान संपेल त्या दिवशी हिंदुस्थान वाचणार नाही. तेच त्यांचे लक्ष्य आहे. मॅच फिक्सिंगची निवडणूक जिंकून भाजपने संविधान बदलले तर संपूर्ण देशात आगडोंब उसळेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

केजरीवाल यांच्यासहा गॅरंटी
पूर्ण देशात २४ तास वीजपुरवठा, संपूर्ण देशात गरीबांना वीज मोफत, प्रत्येक गावात आणि मोहल्ल्यात शानदार सरकारी शाळा, मोहल्ला क्लिनीक, प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी सरकारी इस्पितळे, शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार भाव, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा.. अशा अरविंद केजरीवाल यांच्या सहा गॅरंटी त्यांच्या पत्नी सुनीता यांनी राजकीय व्यासपीठावर प्रथमच पदार्पण करताना वाचून दाखविल्या.

विरोधकांनी डागली टीकेची तोफ
मल्लिकार्जुन खरगे - देशात लोकशाही हवी की हुकुमशाही? लोकशाहीच्या, संविधानाच्या देशाच्या रक्षणासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होऊन, मतभेद विसरुन निवडणूक लढली पाहिजे.
अखिलेश यादव -  भाजप हा ब्रह्मांडातील सर्वात खोटारडा पक्ष आहे. निर्वाचित मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठविल्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभर भाजपची छी थू होत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करुन सत्ता वाचविण्याचा प्रयत्न केल्यास चारसौ पार नाही तर चार सौ से हार निश्चित आहे.
शरद पवार -  केजरीवाल आणि सोरेन यांना करण्यात आलेली अटक ही लोकशाही आणि संविधानावर झालेला हल्ला आहे.
तेजस्वी यादव -  अब की बार चारसौ पार ची घोषणा ऐकून असे वाटत आहे की आधीपासूनच ईव्हीेएम सेटिंग झाली आहे.  
 सीताराम येचुरी -  याच मैदानातून ४७ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य की गुलामी असा नारा देण्यात आला होता. आज त्याची पुनरावृत्ती होत आहे 
भगवंत मान -  हम वो पत्ते नाही जो शाख से गिर जायेंगे, आँधीओ को कह दो अपनी औकात रहे
कल्पना सोरेन -   भाजपच्या हुकुमशाहीविरुद्ध लढणार आणि जिंकणार.

Web Title: lok sabha election 2024: This is an attempt to win elections by fixing matches, Rahul Gandhi accused BJP in the rally of India Aghadi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.