बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या. दरम्यान, भाजपाने कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघामधून कंगना राणावत हिला उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र कंगनाला उमेदवारी जाहीर होताच काही वाद विवादांनाही तोंड फुटलं आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबाबत केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी कंगनाबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं आहे. ‘आज मंडी मे क्या भाव चल रहा है?’ असा प्रश्न विचारणारी पोस्ट सुप्रिया श्रीनेत यांनी कंगना राणावतचा फोटो लावून सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी ही पोष्ट डिलीट केली. तसेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा अॅक्सेस असलेल्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचा दावा सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. मात्र आता या प्रकारावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून, मंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कंगना राणावत हिनेही सुप्रिया श्रीनेत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपाच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कंगना राणावत यांच्याबाबत सुप्रिया श्रीनेत यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आक्षेपार्ह उल्लेख असणारी पोस्ट शेअर झाल्यानंतर खळबळ उडाली होती. ‘आज मंडी मे क्या भाव चल रहा है?’ असा उल्लेख आणि कंगना राणावतचा फोटो त्या पोस्टमध्ये होता. नंतर ही पोस्ट तातडीने डिलीट करण्यात आली. या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की, माझ्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटचा अॅक्सेस असलेल्या कुणीतरी व्यक्तीने अत्यंत आक्षेपार्ह अशी पोस्ट शेअर केली आहे. ती नंतर डिलीट करण्यात आली आहे. मी कुठल्याही स्त्रीबाबत असं काही लिहिणार नाही हे मला ओळखणाऱ्यांना माहिती आहे. तसेच माझ्या नावाचा गैरवापर करून विडंबन करणारे @Supriyaparody नावाचे एक एक्स खाते सुरू आहे. त्यामधून या गैर प्रकाराला सुरुवात झाली असून, आम्ही त्याबाबत तक्रार दाखल करत आहोत, असे सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले.
दरम्यान, सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून करण्यात आलेल्या या आक्षेपार्ह पोस्टला कंगना राणावत हिनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामध्ये कंगना राणावत म्हणाली की, प्रिय सुप्रियाजी मागच्या २० वर्षांच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी एक कलाकार म्हणून विविध प्रकारच्या स्त्री भूमिका साकारल्या आहेत. क्वीनमधील ग्रामीण मुलीपासून ते धाकडमधील महिला गुप्तहेरापर्यंतच्या भूमिकांसा समावेश आहे. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांमधून मुक्त केले पाहिजे. तसेच शरीराच्या अवयवांबात असलेल्या त्यांच्या कुतुहलाचं निराकरण केलं पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचं आव्हानात्मक जीवन आणि परिस्थितीचा अपमान करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. प्रत्येक महिला ही सन्मानास पात्र आहे, असे कंगना राणावत हिने सांगितले.