मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या उमा भारती यांनी मोठा दावा केला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मुद्द्यांवर उभे आहेत ते इंडिया आघाडीने मांडलेले नाहीत. ही मोदीविरोधी एकता आहे, मोदी विचारांच्या विरोधातील एकता नाही. मला असं वाटतं की, या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होईल. पंतप्रधान मोदी 400 नाही, तर 500 पार करतील" असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.
उमा भारती रविवारी ग्वाल्हेरला पोहोचल्या होत्या, येथे त्यांनी जयविलास पॅलेसमध्ये पोहोचून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. यावेळी त्या म्हणाले की, या क्षणी मी पूर्णपणे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत आहे. मी वचन देते की मी त्यांना आयुष्यभर त्यांच्या पालकांची उणीव भासू देणार नाही. मला ज्योतिरादित्य सिंधियामध्ये मोठं भविष्य दिसत आहे."
काँग्रेसवर साधला निशाणा
याआधीही उमा भारती यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. "देश स्वतंत्र झाला आहे, परंतु सोनिया गांधी आणि राहुल गांधी अजूनही स्वतःला राणी आणि राजकुमार समजतात. हे दोघेही भ्रष्टाचार प्रकरणात जामिनावर आहेत. काँग्रेसने भूतकाळात अशा चुका केल्या आहेत की आता त्याबद्दल काही बोलणेही योग्य नाही" असं म्हणत उमा भारती यांनी टीकास्त्र सोडलं होतं.
"काँग्रेसने आपल्या राजवटीत देशाला अडचणीत आणण्याचं काम केलं. काँग्रेसने देशात आणीबाणी लावली आणि सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले. देशातील शीख दंगली केल्या, या सर्व काँग्रेसच्या कारवाया आहेत. काँग्रेसने भूतकाळात इतक्या चुका केल्या आहेत की, आज काँग्रेसबद्दल बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. देशातील जनतेला काँग्रेसबद्दल सर्व माहिती आहे" असंही उमा भारती यांनी म्हटलं होतं.