उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस यावेळी समाजवादी पक्षासोबत इंडिया आघाडी अंतर्गत निवडणूक लढवत आहे. या आघाडीअंतर्गत काँग्रेसला लोकसभेच्या 17 जागा मिळाल्या आहेत. या 17 जागांपैकी पक्षाने आतापर्यंत 13 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर चार जागांवर चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस यावेळी राज्यात काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत आहे.
काँग्रेसने अद्याप उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभेच्या जागेसाठी उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही. या जागेवर भाजपाने पुन्हा एकदा ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून त्या सलग दोनवेळा विजयी झाल्या आहेत. यावेळी हेमा मालिनी विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत.
काँग्रेस बॉक्सर विजेंदर सिंहला या जागेवरून उमेदवारी देऊ शकते. मात्र, त्यांच्या नावावर पक्षात सध्या चर्चा सुरूच आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, या जागेसाठी आणखी काही नावं देखील शर्यतीत असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र या सर्वांमध्ये विजेंदर सिंहचं नाव आघाडीवर आहे.
काँग्रेसने 28 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर काँग्रेसने डॉली शर्मा यांना गाझियाबादमधून उमेदवारी दिली होती. याशिवाय महाराजगंजचे आमदार वीरेंद्र चौधरी, सीतापूरमधून नकुल दुबे आणि बुलंदशहरमधून शिवराम वाल्मिकी यांना तिकीट देण्यात आलं आहे.