दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसंदर्भात भाष्य केले होते. एका वर्षानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शहा यांना पंतप्रधान करतील, असे केजरीवाल म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजनाथ सिंह म्हणाले, "माझे ऐका, भारतीय जनता पक्षाचा एक ज्येष्ठ नेते या नात्याने मला सांगायचे आहे की, 2024 मध्ये तेच (नरेंद्र मोदी) भारताचे पंतप्रधान म्हणून राहतील आणि 2029 मध्येही तेच भारताचे पंतप्रधान होतील." ते एएनआयसोबत बोलत होते.
PM मोदींनी जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली -राजनाथ सिंह म्हणाले, "मला वाटते याहून अधिक स्पष्टपणे आणखी काहीही सांगता येणार नाही. ज्या व्यक्तीने संपूर्ण जगात भारताचा डंका वाजवला... पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे. 2014 पूर्वी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जो देश 14व्या स्थानावर होता, तो आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी तयार आहे."
काय म्हणाले होते केजरीवाल- मद्य घोटाळा प्रकरणी कारागृहातून पॅरोलवर बाहर आलेले अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी भाजपला विचारतो की, त्यांचा पंतप्रधान कोण असेल? मोदी तर पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होत आहेत. 75 वर्षांच्या लोकांना निवृत्त केले जाईल, असा नियम त्यांनी बनवला होता."
पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले होते, "लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना मत देण्याचा अर्थ अमित शाह यांना मत देणे आहे. कारण नरेंद्र मोदी पुढील वर्षात 75 वर्षांचे होतील आणि ते निवृत्त झाल्यानंतर, अमित शाह देशाचे पंतप्रधान होतील."