Mallikarjun Kharge On INDIA Alliance PM Face: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण, अद्याप विरोधकांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
मल्लिकार्जुन खर्गे बुधवारी(1 नोव्हेंबर) छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सुकमा जिल्ह्यात निवडणूक रॅलीसाठी पोहोचले होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पंतप्रधानपदाबाबत विचारणा झाली. यावर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले की, आमची सत्ता आल्यानंतर सर्वजण बसून निर्णय घेणार आहोत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
निवडणुकीतील मुद्दे काय असतील?छत्तीसगडमध्ये काँग्रेससाठी निवडणुकीचा मुद्दा काय आहे, असे विचारले असता काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, प्राथमिक ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मदत करू, महिलांना स्वस्त सिलिंडर देऊ. मुख्यमंत्री कोण असेल? असे विचारले असता खर्गे म्हणाले, त्यावेळी निवडून येणारे आमदार ठरवतील. दरम्यान, छत्तीसगडमध्ये 75 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
मोदी सरकारवर निशाणा यावेळी सभेला संबोधित करताना काँखर्गेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस दिलेली आश्वासने पूर्ण करणार. काँग्रेसने विमानतळे आणि कारखाने बांधले, भाजपने ते श्रीमंतांना विकले. आपण सर्वांनी मिळून मोठ्या मेहनतीने हा देश उभा केला आहे. देशाची संपत्ती विकणारा माणूस देशाच्या कल्याणाचा विचार करत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.