संजय मेश्राम
दीव : दीव आणि दमणमध्ये आतापर्यंत केवळ ९ वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. ज्यामध्ये काँग्रेसने ४ वेळा विजय मिळवला आहे, तर भाजपने 3 वेळा विजय मिळवला आहे. आता या निवडणुकीत भाजप विजयाची हॅटट्रिक करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या ठिकाणी येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. या लोकसभा जागेची मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, जेथे साक्षरता दर सुमारे ८७.०७ टक्के आहे. येथे अनुसूचित जातीची लोकसंख्या सुमारे २.५२% आहे आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या सुमारे ६.३२% आहे.
तांडेल देवजी जोगीभाई यांनी १९८९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून पहिली लोकसभा निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये दमण आणि दीव लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपचे लालभाई बाबूभाई पटेल यांनी काँग्रेसचे केतन दह्याभाई पटेल यांचा ९ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या लालभाई बाबूभाई पटेल यांनी काँग्रेसच्या केतन पटेल यांचा पराभव केला.
दाेन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार कायम
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लालभाई पटेल यांच्यावर विश्वास दाखविला आहे. तसेच, काँग्रेसनेसुद्धा केतन पटेल यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे.
१.२०
लाख एकूण मतदार
६०,९९७
महिला मतदार
६०,७४३
पुरूष मतदार
१९८७मध्ये मतदारसंघ आला अस्तित्वात
दमण आणि दीव हे देशातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक असून, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दमण आणि दिव लोकसभा मतदारसंघ दमण आणि दीव पुनर्रचना कायदा १९८७ अंतर्गत अस्तित्वात आला.
तेंव्हापासून येथे लोकसभा निवडणुका होत आहेत. दमण आणि दीव लोकसभेची जागा सर्वसाधारणसाठी राखीव आहे.